Photo : X
क्रीडा

ॲशेस कसोटी मालिका : कॅरीच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया सुस्थितीत

डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने बुधवारी कसोटी कारकीर्दीतील तिसरे शतक झळकावताना १४३ चेंडूंत १०६ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ॲशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले.

Swapnil S

ॲडलेड : डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने बुधवारी कसोटी कारकीर्दीतील तिसरे शतक झळकावताना १४३ चेंडूंत १०६ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ॲशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले.

ॲडलेड ओव्हल येथे बुधवारपासून सुरू झालेल्या या लढतीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८३ षटकांत ८ बाद ३२६ धावा केल्या आहेत. मिचेल स्टार्क ३३, तर नॅथन लायन शून्यावर नाबाद आहे. कॅरीच्या शतकाला चौथ्या क्रमांकावरील उस्मान ख्वाजाच्या (१२६ चेंडूंत ८२ धावा) अर्धशतकाचीही उत्तम साथ लाभली. त्यामुळे कांगारूंनी ४ बाद ९४ अशा स्थितीतून ३०० धावांपलीकडे मजल मारली. इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चरने ३, तर विल जॅक्सने २ बळी मिळवले आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून यामध्ये ऑस्ट्रेलिया २-० अशी आघाडीवर आहे. दोन्ही कसोटीत कांगारूंनी इंग्लंडला ८ गडी राखून धूळ चारली. मिचेल स्टार्क दोन्ही लढतींमध्ये सामनावीर ठरला. त्यामुळे इंग्लंडला मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी ही लढत जिंकणे गरजेचे आहे. आता २६ डिसेंबरपासून मेलबर्नला चौथी, तर ४ जानेवारीपासून सिडनीला पाचवी कसोटी खेळवण्यात येईल.

१८८२-८३ पासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेस ॲशेस असे संबोधले जाते. २०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची ॲशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे तूर्तास ऑस्ट्रेलियाकडे ॲशेस करंडक आहे. कारण २०२१-२२मध्ये त्यांनी मायदेशात ही मालिका जिंकली होती. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा कांगारूंना मायदेशात ॲशेसवरील वर्चस्व अबाधित राखण्याची संधी आहे.

दरम्यान, स्टीव्ह स्मिथला लढतीच्या दिवशी सकाळी बरे न वाटल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेड (१०), जेक वेदराल्ड (१८), मार्नस लबूशेन (१९) व आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा विदेशी खेळाडू कॅमेरून ग्रीन (०) यांना स्वस्तात गमावले. मात्र ४ बाद ९४ वरून स्मिथच्या जागी संधी लाभलेला उस्मान ख्वाजा व कॅरी यांनी संघाला सावरले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भर घातली. जॅक्सने ख्वाजाचा अडसर दूर केला.

मग जोश इंग्लिस (३२) व कर्णधार पॅट कमिन्स (१३) यांच्यासह कॅरीने छोट्या पण मोलाच्या भागीदाऱ्या रचल्या. त्याने ८ चौकार व १ षटकारासह शतक पूर्ण केले. जॅक्सनेच त्यालाही बाद केले. स्टार्क मात्र ३३ धावांवर नाबाद असून तो गुरुवारी इंग्लंडला आणखी सतावू शकतो. त्यामुळे दुसऱ्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ८३ षटकांत ८ बाद ३२६ (कॅरी १०६, उस्मान ख्वाजा ८२; विल जॅक्स २/१०५)

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय