X
क्रीडा

१.५ कोटी मिळाल्याचे वृत्त खोटे! बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाचे क्रीडा मंत्रालयावर ताशेरे, वैयक्तिक प्रशिक्षकाची मागणीही पूर्ण न केल्याचा आरोप

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनी पोनप्पाने केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर ताशेरे ओढतानाच ऑलिम्पिकपूर्वी हव्या त्या प्रशिक्षकाची केलेली मागणीही फेटाळून लावण्यात आली, असा गौप्यस्फोट तिने केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा संपून दोन दिवस झाले नाही, तोच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनी पोनप्पाने केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर ताशेरे ओढतानाच ऑलिम्पिकपूर्वी हव्या त्या प्रशिक्षकाची केलेली मागणीही फेटाळून लावण्यात आली, असा गौप्यस्फोट तिने केला आहे.

३४ वर्षीय अश्विनी यंदा तनिषा क्रॅस्टोच्या साथीने महिला दुहेरीत खेळली. अश्विनीच्या कारकीर्दीतील ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती. यापूर्वी २०१२ व २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये अश्विनी ज्वाला गुट्टाच्या साथीने सहभागी झाली होती. २०२०मध्ये तिला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरता आले नाही. ज्वालाच्या निवृत्तीनंतर अश्विनी एन. सिक्की रेड्डीसह खेळत होती. डिसेंबर २०२२मध्ये मग अश्विनीने रेड्डीऐवजी तनिषासह खेळण्याचा निर्णय घेतला. या दोघींच्या जोडीने २०२३मध्ये चमकदार कामगिरी केली. दोन स्पर्धांचे जेतेपद मिळवण्यासह अश्विनी-तनिषा जोडीने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. मात्र या जोडीला साखळीत तीनही सामने गमावल्यामुळे गाशा गुंडाळावा लागला.

दरम्यान, बॅडमिंटनमध्ये भारताच्या एकाही खेळाडूला पदक जिंकता न आल्याने एका इंग्रजी क्रीडा संकेतस्थळाने याविषयी लिहिलेल्या वृत्तात अश्विनी व तनिषा यांच्यावर शासनाकडून किती खर्च करण्यात आला, त्यासंबंधी लिहिले. वृत्तानुसार अश्विनी-तनिषा यांना शासनाने ऑलिम्पिकच्या तयारीसाठी १.५ कोटी दिले होते. मात्र अश्विनीने हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.

“मला पूर्णपणे धक्का बसला आहे. मला पैसे देण्यात आलेले नाही, तर आमच्या तयारीवर तसेच राहण्यावर हा खर्च करण्यात आला आहे. १.५ कोटींचा खर्च हा एका खेळाडूवर नाही, तर सराव शिबिरातील सर्वांवर संयुक्तपणे केलेला आहे,” असे अश्विनी म्हणाली. “नोव्हेंबर २०२३पर्यंत माझ्या वैयक्तिक प्रशिक्षकांनासुद्धा मीच मानधन देत होते. टॉप्स योजनेत सहभागी झाल्यावर आम्ही हव्या त्या प्रशिक्षकांची मागणीही केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली,” असेही अश्विनीने नमूद केले. अश्विनीने २०१०, २०१४ व २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली आहे.

“क्रीडा मंत्रालयाने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मात्र मला १.५ कोटी रुपये देण्यात आल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. ४ वर्षांसाठी हा खर्च शासनाने माझ्या तयारीवर केला. त्यामुळे माध्यमांनीही असे लिहिताना काळजी घ्यावी,” असे अश्विनीने अखेरीस सांगितले.

ऑलिम्पिकसाठी अश्विनीला किती निधी?

भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साइ) ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाड़ूंच्या तयारीचा आर्थिक भार उचलण्यात येतो. टॉप्स (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) या योजनेंतर्गत अश्विनीला हा निधी जाहीर करण्यात आला होता, असे समजते. टॉप्सनुसार अश्विनीला ४ लाख ५० हजार, तर वार्षिक सराव आणि स्पर्धा कॅलेंडर (एसीटीसी) उपक्रमांतर्गत १ कोटी ४८ लाख ४ हजार ८० रुपये अश्विनीला देण्यात आले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?