दुबई : यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे रंगणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सलीमीवीर कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व संघांना आपापले संघ जाहीर करायचे आहेत.
९ ते २८ सप्टेंबर या काळात आशिया चषक रंगणार आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी खेळणार आहे, हे पक्के आहे. मात्र सलामीसाठी भारताकडे संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल असे चार पर्याय आहेत. गिल व यशस्वीचे टी-२० संघात पुनरागमन अपेक्षित आहे. तसेच साई सुदर्शनही र्शयतीत आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारताकडे तिलक वर्माचा पर्याय आहे. त्यामुळे निवड समितीची डोकेदुखी वाढणार आहे. २८ सप्टेंबर रोजी आशिया चषकाची अंतिम फेरी आहे. भारत यासाठी पात्र ठरेल, असे गृहित धरले. तर २ ऑक्टोबरपासून लगेच वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची पहिली कसोटी रंगणार आहे. त्यामुळे कसोटीतील खेळाडूंना विश्रांती देण्याचा पर्यायही संघ व्यवस्थापनापुढे उपलब्ध आहे.
दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानशी खेळणार की नाही, याविषयी संभ्रम कायम आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबरला साखळी फेरीतील लढत दुबईत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध फार खराब असून याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात भारताच्या अनेक नागरिकांचा बळी गेला. त्या निषेधार्थ भारताने लिजंड्स वर्ल्ड चॅम्पियनशीप लीगमध्ये (निवृत्त खेळाडूंची) पाकिस्तान संघाविरुद्ध दोन्ही सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता बीसीसीआयवरही भारताच्या मुख्य संघाचे पाकिस्तानशी सामने आयोजित न करण्याबाबत चाहत्यांकडून दबाव टाकण्यात येत आहे. आयसीसी स्पर्धांमध्येच फक्त भारताने पाकिस्तानशी खेळावे, अशी मागणीही चाहते करत आहेत.
आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल. एकंदर स्पर्धेतील १९ पैकी ११ सामने दुबईत, तर ८ लढती अबुधाबी येथे होणार आहेत. गटातील अव्वल दोन संघ सुपर-फोर फेरी गाठतील. या फेरीतही भारत-पाकिस्तान आमनेसामने येऊ शकतात.