Photo : X (TheHockeyIndia)
क्रीडा

Asia Cup Hockey 2025 : महिला हॉकी संघाला रौप्यपदकावर समाधान; अंतिम फेरीत चीनकडून १-४ असा पराभव

भारतीय महिला हॉकी संघाला रविवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात चीनकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्याची संधी भारताने गमावली.

Swapnil S

हांगझो (चीन) : भारतीय महिला हॉकी संघाला रविवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात चीनकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्याची संधी भारताने गमावली.

एकीकडे बिहारमध्ये भारतीय पुरुषांनी आशिया चषक उंचावल्यावर आता चीनमध्ये भारतीय महिलासुद्धा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील, अशी आशा होती. २००४ व २०१७मध्ये आशिया चषक जिंकणारा भारतीय संघ एकंदर चौथ्यांदा अंतिम फेरीत खेळत होता. मात्र त्यांना आठ वर्षांनी ही स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. चीनने २००९नंतर प्रथमच ही स्पर्धा जिंकून २०२६मध्ये बेल्जियमला होणाऱ्या विश्वचषकाची थेट पात्रता मिळवली. आता भारतीय महिलांना पात्रता फेरीत खेळून विश्वचषकाचे तिकीट मिळवण्याची अखेरची संधी असेल.

दीपिका व सविता पुनिया यांच्या अनुपस्थितीत सलिमा टेटे भारताच्या महिला संघाचे नेतृत्व करत होती. हरेंद्र सिंग यांच्या प्रशिक्षणात खेळताना भारताने गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली होती. मग सुपर-फोर फेरीत भारताने कोरियाला नमवले, तर जपानला बरोबरीत रोखले होते. मात्र त्या फेरीतही चीनकडून भारताचा पराभव झाला होता. तरीसुद्धा भारताने सुपर-फोर फेरीत दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली.

रविवारी भारताने अंतिम सामना सुरू होताच पहिल्याच मिनिटाला नवनीत कौरच्या पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर चीनने खेळावर वर्चस्व मिळवत झिक्सिया ओऊ (२१वे मिनिट), हाँग ली (४१वे), मीरोंग झोऊ (५१वे) आणि जियाकी झोंग (५३वे) यांच्या गोलमुळे एकंदर तिसऱ्यांदा आशिया कप किताब जिंकला.

अंतिम सामन्यात भारतीय आक्रमण फळीला अपयश आले. मुमताज खान, लालरेमसिआमी आणि सुनिता टोप्पो यांसारख्या खेळाडूंनी याआधी चांगला खेळ केला होता, पण अंतिम फेरीत त्या चमक दाखवू शकल्या नाहीत. आता भारताला २८ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणाऱ्या विश्वचषक पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. त्यामध्ये १६ संघ सहभागी होणार असून ७ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर