क्रीडा

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा: भारताचा विजयी चौकार! हरमनप्रीत सिंगचे दोन गोल, कोरियावर ३-१ असा विजय

Swapnil S

हुलूनबुईर (चीन) : कर्णधार हरमनप्रीत सिंग याने लगावलेल्या दोन गोलच्या बळावर भारताने कोरियाचा ३-१ असा पाडाव केला. भारताने हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत सलग चौथ्या विजयाची नोंद केली, मात्र त्या आधीच भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या भारताने याआधीच्या तीन सामन्यांत चीनचा ३-०, जपानचा ५-० आणि गेल्या वर्षीच्या उपविजेत्या मलेशियाचा ८-१ असा पराभव केला आहे. आता साखळी फेरीतील भारताची शेवटची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी शनिवारी होणार आहे. सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यापैकी उपांत्य फेरीचे सामने सोमवारी आणि अंतिम लढत मंगळवारी रंगणार आहे.

भारताने कोरियाविरुद्धच्या सामन्यातही दमदार कामगिरी करत चांगली सुरुवात केली. पहिल्या सत्रातच दोन गोल करत भारताने २-० अशी आघाडी घेतली होती. अरायजीत सिंग हुंडाल याने आठव्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल साकारला. त्यानंतर जगातील सर्वोत्तम ड्रॅगफ्लिकर्सपैकी एक असलेल्या हरमनप्रीत सिंगने नवव्या आणि ४३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. कोरियाकडून एकमेव गोल जिहून यँग याने पेनल्टी कॉर्नरवर केला.

पॅरिस ऑलिम्पिकनंतर प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारताने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली आहे. याचा मोठा फायदा भारताला होताना दिसत आहे. पहिल्या १० मिनिटांच्या कालावधीत भारताचा गुणफलक वेगाने हलताना दिसत आहे. आठव्या मिनिटाला सुखजीत सिंगने दिलेल्या पासवर अरायजीतने सुरेख गोल करत भारताचे खाते खोलले. एका मिनिटानंतर राज कुमार पाल याने भारताला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. त्यावर हरमनप्रीतने दमदार ड्रॅगफ्लिकचा फटका लगावत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. विशेष म्हणजे, युवा आघाडीवीर राज कुमारने मलेशियाविरुद्ध आपली पहिली हॅटट्रिक झळकावली होती.

भारताचा गोलरक्षक आणि ‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणारा पी. आर. श्रीजेश याने पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्ती पत्करल्यावर आता सूरज करकेरा याला राखीव गोलरक्षक म्हणून संधी देण्यात आली. दुसऱ्या सत्रात त्याने कोरियाचे आक्रमण थोपवून धरत त्यांना गोल करण्याची संधी दिली नाही. पहिल्या सत्रात शानदार खेळाचे प्रदर्शन केल्यानंतर दुसऱ्या सत्रात मात्र भारताला खेळात सातत्य राखता आले नाही. त्याउलट कोरियाने १५ मिनिटांच्या या सत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. मात्र भारताची भक्कम भिंत त्यांना भेदता आली नाही. मध्यंतराआधी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवत यँग याने कोरियासाठी पहिला गोल केला.

कोरियाला ३५व्या मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र भारताने चांगला बचाव करत कोरियाला बरोबरी साधण्याची संधी दिली नाही. ४३व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर कोरियाचा गोलरक्षक जेहान किम याला चकवत गोल लगावला आणि भारताला ३-१ असे आघाडीवर आणले. चौथ्या सत्रात जरमनप्रीत सिंग याच्या चुकीमुळे कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र भारताच्या उत्तम बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला