इचिनोमिया : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात करत बांगलादेशचा ३-० असा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि के. श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने थेट गेममध्ये जिंकत भारताचा एकतर्फी विजय निश्चित केला.
या विजयासह भारतीय पुरुषांनी मंगळवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानविरुद्धच्या लढतीचे स्थान पक्के केले आहे.
लक्ष्य सेनने इब्न अयमान जमानचा अवघ्या २८ मिनिटांत २१-४, २१-१२ असा पराभव करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आयुष शेट्टीने गौरव सिंगला २५ मिनिटांत २१-४, २१-१३ असे हरवले. तिसऱ्या सामन्यात अनुभवी के. श्रीकांतने जुमार अल अमीनचा २३ मिनिटांत २१-१५, २१-९ असा पराभव केला.