Asian Games 2026 Kabaddi : भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत; पदकही निश्चित (Photo-X)
क्रीडा

Asian Games 2026 Kabaddi : भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत; पदकही निश्चित

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत गुरुवारी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Swapnil S

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत गुरुवारी उपांत्य फेरीत प्रवेश केला. अ-गटामधील शेवटच्या सामन्यांमध्ये भारतीय पुरुष संघाने चायनीज तैपेईचा ३७-२१ असा पराभव केला, तर महिला संघाने यजमान जपानवर ५०-२५ अशी दणदणीत मात करत आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले. या विजयामुळे दोन्ही संघांचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.

पुरुष गटात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. मध्यंतरापर्यंत भारताकडे २३-११ अशी भक्कम आघाडी होती. दुसऱ्या सत्रातही भारतीय खेळाडूंनी १४-१० अशी आघाडी घेत सामना ३७-२१ असा जिंकला. या सामन्यात भारताने यशस्वी चढायांतून २८ गुण, ३ बोनस गुण आणि ऑलआऊटचे ६ गुण मिळवले. गट फेरीत दक्षिण कोरिया, जपान आणि बांगलादेशचा पराभव केल्यानंतर भारताचा हा सलग चौथा विजय ठरला असून संघ अपराजित राहिला आहे. १९९० मध्ये आशियाई खेळात कबड्डीचा समावेश झाल्यापासून भारतीय पुरुष संघाने ८ सुवर्णपदकांसह एकूण ९ पदके जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. २०१८ मध्ये या सुवर्ण मालिकेत खंड पडला होता आणि भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

महिला गटात भारतीय संघानेही अपराजित राहत उपांत्य फेरी गाठली. सलामीच्या सामन्यात बांगलादेशचा आणि त्यानंतर इराणचा ३७-२३ असा पराभव केल्यानंतर भारतीय महिलांनी जपानविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या सत्रात ३२-१३ अशी मोठी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रात १८ गुणांची भर घालत सामना ५०-२५ असा खिशात घातला. महिला संघाने चढायांतून ३७, बोनसचे ७ आणि ऑलआऊटचे ६ गुण मिळवून वर्चस्व गाजवले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Thane : पितृपक्षात तर्पण विधी महागले; सामान्यांच्या आवाक्याबाहेर दक्षिणा, कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी

उरण : जेएनपीए बंदरावर तीन कोटींचे बेकायदेशीर फटाके जप्त; DRI च्या अधिकाऱ्यांची कारवाई, मुख्य संशयिताला अटक

Thane : शनिवारी काही भागातील पाणीपुरवठा बंद

Bhiwandi : नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखीव

Karjat : रूळ ओलांडताना एक्स्प्रेसची धडक; प्रवाशाचा मृत्यू, कर्जत रेल्वे पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद