नेमबाजीत तिहेरी पदकवेध! १० मीटर एअर रायफलमध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य, भारतीय नेमबाजांची एकूण पदकांची संख्या पाचवर X
क्रीडा

नेमबाजीत तिहेरी पदकवेध! १० मीटर एअर रायफलमध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य, भारतीय नेमबाजांची एकूण पदकांची संख्या पाचवर

भारताच्या युवा नेमबाजांनी सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक अशा तीन पदकांची कमाई केली. हिमांशू धिल्लनने रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्यपदक पटकावले. हिमांशू, रुद्रांक्ष आणि १८ वर्षीय पार्थ माने यांनी सांघिक प्रकारातही रौप्यपदक मिळवले.

Swapnil S

नागोया : भारताच्या युवा नेमबाजांनी सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक अशा तीन पदकांची कमाई केली. हिमांशू धिल्लनने रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्यपदक पटकावले. हिमांशू, रुद्रांक्ष आणि १८ वर्षीय पार्थ माने यांनी सांघिक प्रकारातही रौप्यपदक मिळवले.

या तीन पदकांमुळे नेमबाजीतील भारताची एकूण पदकसंख्या पाच झाली असून त्यात चार रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. मात्र, चीनचा पॅरिस ऑलिम्पिकमधील दुहेरी सुवर्णपदक विजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल नेमबाज शेंग लिहाओ याला कोणीही मागे टाकू शकले नाही. शेंगने २५४.२ गुणांसह आशियाई क्रीडा स्पर्धेचा आणि आशियाई विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. सोमवारी २१वा वाढदिवस साजरा करणाऱ्या हिमांशूने २५२.४ गुणांसह रौप्यपदक जिंकले. रुद्रांक्षने २३०.९ गुणांसह कांस्यपदक मिळवले. सुरुवातीला रुद्रांक्षने शेंगला कडवी झुंज देण्याची क्षमता दाखवली होती. दुसऱ्या मालिकेनंतर रुद्रांक्ष १०६.० गुणांसह शेंगपेक्षा १.१ गुणांनी पुढे होता, तर हिमांशू १०४.८ गुणांवर होता.

मात्र अंतिम फेरीतील एलिमिनेशन मालिकेत परिस्थिती बदलली. रुद्रांक्षला ९.७ गुणांची फेरी नोंदवावी लागली, तर हिमांशूने १०.६ गुणांची कामगिरी करत २४ शॉट्सच्या अंतिम फेरीतील २२व्या शॉटनंतर दुसरे स्थान मिळवले. अखेरीस हिमांशूने रुद्रांक्षपेक्षा केवळ ०.१ गुणांची आघाडी राखत रौप्यपदक निश्चित केले.

हिमांशूसाठी हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदार्पण आहे. शिस्त शिकण्यासाठी वडिलांच्या आग्रहावरून त्याने एक वर्ष गुरुकुलात घालवले होते. नेमबाजीकडे वळण्यापूर्वी त्याने कुस्तीचेही काही काळ प्रशिक्षण घेतले होते. या अनुभवाचा अंतिम फेरीत शेवटपर्यंत लढण्यास फायदा झाल्याचे हिमांशूने सांगितले.

दरम्यान, वैयक्तिक अंतिम फेरीच्या अवघ्या तासाभरापूर्वी हिमांशू, माजी विश्वविजेता रुद्रांक्ष आणि पार्थ माने यांनी सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. चीनने १८९९.० गुणांसह सुवर्णपदक जिंकताना स्वतःचाच १८९८.४ गुणांचा जागतिक विक्रम मोडला. दक्षिण कोरियाने १८८४.२ गुणांसह कांस्यपदक मिळवले, तर भारताने १८९०.१ गुणांसह रौप्यपदक पटकावले.

पार्थ मानेसाठीही ही कामगिरी विशेष ठरली. १८ वर्षीय पार्थची ही पहिलीच आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. सोलापूरमध्ये वाढलेल्या पार्थला वयाच्या १३व्या वर्षी त्याच्या पोलीस अधिकारी वडिलांनी शाळेतील उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात नेमबाजीची ओळख करून दिली.

पुढे चांगल्या सुविधा आणि प्रशिक्षणासाठी त्याच्या कुटुंबाने मुंबईत स्थलांतर केले. तेथे त्याला ऑलिम्पियन आणि प्रशिक्षक सुमा शिरूर यांचे मार्गदर्शन मिळाले.वैयक्तिक पात्रता फेरीत रुद्रांक्ष ६३१.८ गुणांसह तिसरा, हिमांशू ६३०.० गुणांसह सातवा ठरला. पार्थने ६२८.३ गुण मिळवत आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन