क्रीडा

लायनने मोडला वॉल्श यांचा रेकॉर्ड; न्यूझीलंड १७९ धावांत गारद, ऑस्ट्रेलियाकडे २१७ धावांची आघाडी

ऑस्ट्रेलियाचा ३६ वर्षीय ऑफस्पिनर नॅथन लायनने (५२१) शुक्रवारी सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत सातवे स्थान पटकावत...

Swapnil S

वेलिंग्टन : ऑस्ट्रेलियाचा ३६ वर्षीय ऑफस्पिनर नॅथन लायनने (५२१) शुक्रवारी सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत सातवे स्थान पटकावताना वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श (५१९) यांना पिछाडीवर टाकले. लायनने ४३ धावांत मिळवलेले चार बळी आणि कॅमेरून ग्रीनने (२७५ चेंडूंत नाबाद १७४ धावा) साकारलेल्या दीडशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भक्कम आघाडी मिळवली आहे.

वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ४३.१ षटकांत १७९ धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १३ धावा केल्या आहेत. मात्र पहिल्या डावातील तब्बल २०४ धावांच्या आघाडीमुळे ते एकूण २१७ धावांनी आघाडीवर आहेत. कर्णधार टिम साऊदीने स्टीव्ह स्मिथ (०) व मार्नस लबूशेन (२) यांना स्वस्तात बाद केले. उस्मान ख्वाजा (५) आणि नाईट-वॉचमन लायन ६ धावांवर खेळत आहे.

तत्पूर्वी, गुरुवारच्या ९ बाद २७९ धावांवरून पुढे खेळताना ग्रीन व जोश हेझलवूड या ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या जोडीने १०व्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली. ग्रीनने कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवताना २३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद १७४ धावा केल्या. मॅट हेन्रीने हेझलवूडला २२ धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३८३ धावांवर गुंडाळला. हेन्रीने डावात पाच बळी पटकावले.

त्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव लायनपुढे गडगडला. केन विल्यम्सन (०) कारकीर्दीत पहिल्यांदाच धावचीत झाला. टॉम लॅथम (५), रचिन रवींद्र (०), डॅरेल मिचेल (११) यांनी निराशा केली. ग्लेन फिलिप्स (७१) व हेन्री (४०) यांनी प्रतिकार केल्याने किवी संघाने किमान दीडशे धावांचा टप्पा गाठला.

सर्वाधिक कसोटी बळी

१. मुथय्या मुरलीधरन : ८००

२. शेन वॉर्न : ७०८

३. जेम्स अँडरसन : ६९८*

४. अनिल कुंबळे : ६१९

५. स्टुअर्ट ब्रॉड : ६०४

६. ग्लेन मॅकग्रा : ५६३

७. नॅथन लायन : ५२१*

८. कर्टनी वॉल्श : ५१९

९. रविचंद्रन अश्विन : ५०७*

(* ही खूण दर्शवलेले खेळाडू अद्याप कसोटी क्रिकेट खेळत आहेत.)

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री