अॅडलेड : ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ कारकीर्दीतील निर्णायक टप्प्यावर कसोटी प्रकारात सलामीवीराची भूमिका बजावण्यासाठी सज्ज होत आहे. ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३४ वर्षीय स्मिथकडेच सर्वांचे लक्ष असेल. तसेच कसोटी क्रिकेट टिकवण्याच्या दृष्टीने विंडीज या मालिकेत ऑस्ट्रेलियाला कितपत लढा देणार, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल.
ऑस्ट्रेलियासाठी २०२३ हे वर्ष फार यशस्वी ठरले. एकदिवसीय विश्वचषक, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांनी ॲशेस करंडकही कायम राखला. मग वर्षाखेरीस तसेच वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानला तिन्ही कसोटींमध्ये कांगारूंनी धूळ चारली. डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेद्वारे कसोटी प्रकारातून निवृत्ता जाहीर केली. त्यामुळे आता १०५ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेला स्मिथ चौथ्याऐवजी सलामीला फलंदाजीस येणार असून कॅमेरून ग्रीन चौथ्या स्थानी फलंदाजी करेल. ऑस्ट्रेलियाने या कसोटीसाठी ११ खेळाडूही जाहीर केले आहेत.
दुसरीकडे क्रेग ब्रेथवेटच्या विंडीजकडून या मालिकेत फारशी अपेक्षा नसली तरी ते ऑस्ट्रेलियाला लढा देतील, अशी आशा आहे. १९९७पासून त्यांनी ऑस्ट्रेलियात एकही कसोटी जिंकलेली नाही. विंडीजने या सामन्यासाठी ११ खेळाडूंत केव्हम हॉज, जस्टीन ग्रीव्ह्स व शेमार जोसेफ या तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. २०२२पासून विंडीजचा संघ फक्त ६ कसोटी सामने खेळला आहे.