क्रीडा

ऑस्ट्रेलियन ओपन : सबालेंका-रायबॅकिना यांच्यात महिला एकेरीची अंतिम लढत; पराभवामुळे पेगुला, स्विटोलिना यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात

सबालेंकाने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली असून तिला कारकीर्दीत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे, तर रायबॅकिनाने दुसऱ्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शनिवारी रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Swapnil S

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत गुरुवारी बेलारूसची अग्रमानांकित आर्यना सबालेंका आणि कझाकस्तानची एलिना रायबॅकिना यांनी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. सबालेंकाने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली असून तिला कारकीर्दीत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे, तर रायबॅकिनाने दुसऱ्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शनिवारी रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्याकडे सर्वांचे लक्ष असेल.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या ११४व्या पर्वाला गेल्या आठवड्यात प्रारंभ झाला. यंदा उद्घाटन सोहळ्यासाठी टेनिसच्या दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा म्हणून ऑस्ट्रेलियन ओपनला ओळखले जाते. यंदा १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. गतवर्षी या स्पर्धेत इटलीचा यॅनिक सिनर व अमेरिकेची मॅडीसन कीझ यांनी जेतेपद मिळवले होते. यंदा पुरुष एकेरीत स्पेनचा कार्लोस अल्कराझ, तर महिलांमध्ये सबालेंका यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

पुरुषांमध्ये एकीकडे गतविजेता व दुसरा मानांकित सिनर, अल्कराझ, तृतीय मानांकित जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि सर्बियाचा चौथा मानांकित नोव्हाक जोकोव्हिच यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. झ्वेरेव्हसमोर अल्कराझचे, तर सिनरसमोर जोकोव्हिचचे आव्हान असेल. शुक्रवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य लढती रंगतील. जोकोव्हिचने २०२३नंतर एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे तो २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शोधात आहे. गेल्या दोन वर्षांतील आठ ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये अल्कराझ व सिनर यांनीच प्रत्येकी चार विजेतेपद काबिज केले आहेत. त्यामुळे त्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्याचे आव्हान जोकोव्हिचपुढे असेल.

दरम्यान, गुरुवारी पार पडलेल्या महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत दोन्ही खेळाडूंनी एकतर्फी विजय मिळवले. २७ वर्षीय सबालेंकाने १२व्या मानांकित एलिना स्विटोलिनाला ६-२, ६-३ अशी सहज धूळ चारली. सबालेंकाने २०२३ व २०२४मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवले होते. तर गतवर्षी तिला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता ती पुन्हा जेतेपद मिळवण्यास उत्सुक असेल. मुख्य म्हणजे २०२३मध्ये सबालेंकाने अंतिम फेरीत रायबॅकिनालाच नमवले होते.

दुसरीकडे २६ वर्षीय रायबॅकिनाने कारकीर्दीत दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या सहाव्या मानांकित जेसिका पेगुलावर ६-३, ७-६ (९-७) असे वर्चस्व गाजवले. रायबॅकिनाला आता कारकीर्दीतील पहिले ऑस्ट्रेलियन जेतेपद खुणावत आहे. त्यामुळे ती २०२३च्या पराभवाचा वचपा घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मुख्य म्हणजे दोन्ही खेळाडूंनी या स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. म्हणजेच दोन्ही खेळाडू सहा सामन्यांत सलग १२ सेट जिंकून अंतिम फेरीत दाखल झालेले आहेत. त्यामुळे दोघींमध्ये कडवे द्वंद्व पाहायला मिळेल.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

Budget 2026 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? उद्या सादर होणारं बजेट कितवं? जाणून घ्या

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश