टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत रविवारी पहिल्या सामन्यात बांगलादेशने झिम्बाब्वेला तीन धावांनी नमवित चित्तथरारक विजय मिळविला. १९ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स टिपणाऱ्या तस्कीन अहमदला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर अवघ्या एक धावेने मात देणाऱ्या झिम्बाब्वेला बांगलादेशकडून शेवटच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला. विजयासाठी १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला निर्धारित षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. एका क्षणी झिम्बाब्वेचा निम्मा संघ ११.२ षटकांत ६९ धावांत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्याचवेळी विजय बांगलादेशच्या आवाक्यात होता. सेन विलियम्सने झिम्बाब्वेकरिता झुंजार खेळी करत ४२ चेंडूंत ६४ धावा केल्या. सामना बांगलादेशच्या हातून निसटणार असे वाटत असतानाच कर्णधार शाकीब अल हसनने १९ व्या षटकात विलियम्सला धावबाद केले. विलियम्सने ८ चौकार लगावले.
मोसादेक हुसेनने टाकलेले शेवटचे षटक अतिशय रोमाहर्षक ठरले. झिम्बाब्वेला विजयासाठी ६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. परंतु प्रत्येक चेंडूवर सामन्याला कलाटणी मिळून अखेर बांगलादेशचा विजय साकारला गेला. यष्टीरक्षक नुरूल हसन याने शेवटचा चेंडू स्टम्पच्या पुढे झेलत फलंदाजाला यष्टिचीत केल्याने हा नोबॉल घोषित करण्यात आला आणि मैदानाबाहेर गेलेल्या खेळाडूंना पुन्हा बोलावण्यात आले होते. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने नजमुल हुसेन शांतोच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ बाद १५० धावा केल्या होत्या.
शांतोने ५५ चेंडूंत ७१ धावा करताना सात चौकार आणि एक षटकार लगावला. शांतोचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक ठरले. त्याला सिकंदर रझाने एरविनमार्फत झेलबाद केले. अफिफ हुसन हा बांगलादेश संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हुसनने १९ चेंडूंत २९ धावा केल्या.
असा रंगला शेवटच्या षटकातील थरार
१९.१ : झिम्बाब्वेला विजयासाठी हव्या होत्या ६ चेंडूत १६ धावा. मोसादेकच्या पहिल्या चेंडूवर रायन बर्लने एक लेगबाइज धाव घेतली.
१९.२ : आता लक्ष्य झाले ५ चेंडूंत १५ धावांचे. मोसादेकने ब्रॅड इव्हान्सला झेलबाद केले.
१९.३ : आता लक्ष्य झाले ४ चेंडूंत १५ धावांचे. मोसादेकच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या नगारवाने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला; पण चेंडू पायाला लागून सीमारेषेबाहेर चौकार गेला.
१९.४ : आता लक्ष्य झाले ३ चेंडूंत ११ धावांचे. नगारवाने चौथ्या चेंडूवर मोसादेकला षटकार लगावला.
१९.५ : आता लक्ष्य झाले २ चेंडूंत ५ धावांचे. मात्र नगारवा यष्टिचीत झाला.
१९.६ : आता लक्ष्य झाले १ चेंडूत ५ धावांचे. मुझारबानीदेखील यष्टिचीत झाल्याचे समजून बांगलादेशने विजयी जल्लोष केला. दोन्ही संघ मैदानातून बाहेर आले, मात्र अंपायर्सनी रिव्ह्यू पाहून विकेटकिपर नुरूल हसनने चेंडू विकेटच्या पुढे पकडल्याचे निदर्शनास आणून देत नोबॉल दिला. त्यामुळे मैदान सोडलेले खेळाडू एका चेंडूसाठी पुन्हा मैदानात आले. हा चेंडू फ्री हिट होता.
१९.६ (फ्री हिट) : या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज होती; पण या चेंडूला मुझारबानीच्या बॅटचा स्पर्शही होऊ शकला नाही. बांगलादेशने सामना तीन धावांनी जिंकला.