नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने तब्बल ५८ कोटींचे पारितोषिक जाहीर केले आहे. हे बक्षीस आयसीसीतर्फे देण्यात येणाऱ्या जेतेपदाच्या पारितोषिकापेक्षा तिप्पट आहे.
पाकिस्तान आणि दुबई येथे संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने अपराजित राहून जेतेपद काबिज केले. ९ मार्च रोजी दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ गडी राखून पराभूत केले. यानंतर आयसीसीने भारताला १९.८० कोटी रुपयांचे पारितोषिक दिले. मात्र बीसीसीआयने तब्बल ५८ कोटींचे पारितोषिक जाहीर करून आपली ताकद दाखवून दिली.
“लागोपाठ दोन आयसीसी स्पर्धा जिंकणे स्वप्नवत आहे. त्यामुळे भारतीय संघ व संघाच्या प्रशिक्षकीय चमूतील प्रत्येक सदस्य या पारितोषिकाचा हकदार आहे. ५८ कोटींचे पारितोषिक खेळाडू व प्रशिक्षकांच्या फळीला विभागून देण्यात येईल,” असे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी जाहीर केले. मात्र कोणत्या खेळाडूला अथवा प्रशिक्षकांना किती रक्कम देणार, हे बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही. २०२४मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताने नऊ महिन्यांतच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आता फक्त कसोटीतील जागतिक अजिंक्यपद भारताने जिंकणे बाकी आहे.
भारताची राष्ट्रकुल स्पर्धेसाठी दावेदारी
२०३०मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने दावेदारी केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱ्याने याविषयी गुरुवारी माहिती दिली. भारताला २०३६च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने भारताने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रथम दावेदारी केली आहे. गुजरातमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल. यापूर्वी २०१०मध्ये नवी दिल्ली येथे भारताने राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली होती. दरम्यान, गुरुवारी झिम्बाब्वेच्या कर्स्टी कॉन्व्हेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.