पर्थ : मुंबईकर यशस्वी जैस्वाल (२९७ चेंडूंत १६१ धावा) आणि तारांकित विराट कोहली (१४३ चेंडूंत नाबाद १०० धावा) या युवा-अनुभवी फलंदाजांच्या जोडीने रविवारी दमदार शतके झळकावली. त्यामुळे भारताने दुसरा डाव १३४.३ षटकांत ६ बाद ४८७ धावांवर घोषित केला. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या वेगवान माऱ्याने कांगारूंना पुन्हा हादरवले. त्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ४.२ षटकांत ३ बाद १२ अशी अवस्था असून त्यांना विजयासाठी आणखी ५२२ धावांची आवश्यकता आहे.
पर्थ येथील ओप्टस स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी खेळवण्यात येणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांमध्ये शर्यत सुरू आहे. त्यातच न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावल्याने भारतावर दडपण अधिक वाढले असून त्यांना ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकणे अनिवार्य आहे. मात्र भारताने यजमान ऑस्ट्रेलियावरच दडपण टाकून पहिल्या लढतीत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
पहिला डाव १५० धावांत संपुष्टात आल्यावर भारताने कांगारूंना शनिवारीच १०४ धावांत गुंडाळले. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर भारताने बिनबाद १७२ धावांपर्यंत मजल मारली होती. तेथून पुढे रविवारी तिसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा कांगारूंवर वर्चस्व गाजवले. २२ वर्षीय यशस्वीने पॅट कमिन्सला अप्पर कट लगावून दणक्यात ऑस्ट्रेलियातील पहिले शतक साकारले. त्याने व के. एल. राहुल यांच्या जोडीने ६३व्या षटकात द्विशतकी सलामी नोंदवली. राहुललासुद्धा शतकाची उत्तम संधी होती. मात्र मिचेल स्टार्कने ७७ धावांवर त्याला बाद केले.
त्यानंतर यशस्वी व देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भर टाकली. जोश हेझलवूडने दुसऱ्या सत्रातील पहिल्याच चेंडूवर पडिक्कलला (२५) माघारी पाठवले. त्यानंतर विराटचे मैदानावर आगमन झाले. यशस्वीने दुसऱ्या बाजूने दीडशतकाची वेस ओलांडली. मात्र मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर १६१ धावांवर तो बाद झाला. त्याने १५ चौकार व ३ षटकारांसह चौथे शतक झळकावले. ऋषभ पंत (१) व ध्रुव जुरेल (१) यांनी हाराकिरी केली. त्यामुळे भारताची २ बाद ३१३ वरून ५ बाद ३२१ अशी घसरगुंडी उडाली.
मात्र विराटने वॉशिंग्टन सुंदरला साथीला घेत संघाला ४०० धावांचा पल्ला गाठून दिला. त्याने प्रथम अर्धशतक साकारले. तसेच स्टार्कला उत्तुंग षटकार लगावला. मात्र सुंदरला लायनने २९ धावांवर त्रिफळाचीत केले. नितीश रेड्डीने मात्र येताच क्षणी फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. त्यामुळे विराटचेही मनोबल उंचावले. भारतीय संघ लवकरच डाव घोषित करण्याचे संकेत मिळाल्यावर विराटनेही आक्रमण केले.
अखेर लायनला स्वीपचा फटका लगावून विराटने कसोटीतील ३०वे शतक साकारले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ८१वे शतक ठरले. मुख्य म्हणजे जुलै २०२३नंतर प्रथमच विराटने कसोटीत शतक साकारले. विराट व नितीश यांनी सातव्या विकेटसाठी ७७ धावांची भर घातली. विराटचे शतक होताच भारताने डाव घोषित करून ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ५३४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.
त्यानंतर तिसऱ्या दिवसाची ५ षटके शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात खराब सुरुवात झाली. बुमराने पहिल्याच षटकात नॅथन मॅकस्वीनीला शून्यावर पायचीत पकडले. मग मोहम्मद सिराजने नाइट-वॉचमन कमिन्सचा (२) अडथळा दूर केला. दिवसातील अखेरच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर बुमराने मार्नस लबूशेनलाही (३) पायचीत पकडून कांगारूंना तिसरा धक्का दिला. आता उस्मान ख्वाजा ३ धावांवर नाबाद असून स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड असे फलंदाज शिल्लक आहेत. त्यामुळे ३ बाद १२ अशा स्थितीत असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ उर्वरित ५२२ धावांचे आव्हान भारतीय गोलंदाजांविरुद्ध कसे पेलणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : १५०
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १०४
भारत (दुसरा डाव) : १३४.४ षटकांत ६ बाद ४८७ घोषित (यशस्वी जैस्वाल १६१, विराट कोहली नाबाद १००, के. एल. राहुल ७७; नॅथन लायन २/९६)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ४.२ षटकांत ३ बाद १२ (उस्मान ख्वाजा नाबाद ३; जसप्रीत बुमरा २/१, मोहम्मद सिराज १/७)
यशस्वीने कसोटी कारकीर्दीतील चौथे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियात पहिल्याच लढतीत त्याने शतक साकारण्याची किमया साधली. त्याने इंग्लंडविरुद्ध दोन, तर वेस्ट इंडिजविरुद्ध एक शतक केले होते.
विराटने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ८१वे शतक झळकावले. तसेच कसोटीतील त्याचे हे वर्षभरानंतर ३०वे शतक ठरले. जुलै २०२३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विराटने अखेरचे कसोटी शतक साकारले होते.