भारताच्या दोन्ही खो-खो संघांची विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक social media
क्रीडा

भारताच्या दोन्ही खो-खो संघांची विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक; विश्वविजेतेपदासाठी आज दोघांची नेपाळशी गाठ; उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेवर दुहेरी वर्चस्व

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील शनिवारचा दिवस भारतासाठी दुहेरी विजयांचा ठरला. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा ६६-१६ असा तब्बल ५० गुणांच्या फरकाने धुव्वा उडवला.

Swapnil S

ऋषिकेश बामणे/मुंबई

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील शनिवारचा दिवस भारतासाठी दुहेरी विजयांचा ठरला. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा ६६-१६ असा तब्बल ५० गुणांच्या फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर प्रतीक वाईकरच्या नेतृत्वात भारतीय पुरुषांनी दक्षिण आफ्रिकेवर ६०-४२ अशी मात केली. या विजयांसह भारताच्या दोन्ही संघांनी थाटात अंतिम फेरी गाठली. रविवारी दोन्ही संघांची जेतेपदासाठी नेपाळशी गाठ पडणार आहे.

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर गेल्या पाच दिवसांपासून खो-खो विश्वचषक सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय महिलांनी साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकण्याची किमया साधली होती. तिन्ही लढतींमध्ये भारताने शतकी गुणसंख्या नोंदवताना अनुक्रमे दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियाला धूळ चारली. त्यानंतर शुक्रवारी उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय महिलांनी बांगलादेशलाही नेस्तनाबूत केले. मग शनिवारी दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवून भारताने अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार प्रियंका तसेच रेश्मा राठोड, मगई माझी यांनीही विजयात सुरेख योगदान दिले.

पुरुष गटात भारताने साखळीत सलग चार सामने जिंकून अग्रस्थान काबिज केले होते. त्यांनी अनुक्रमे नेपाळ, ब्राझील, पेरू आणि भूतान यांना नमवले. मात्र शुक्रवारी उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय पुरुषांनी प्रथमच शतकी गुणसंख्या नोंदवताना श्रीलंकेचा धुव्वा उडवला. शनिवारी मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकवेळ पिछाडीवर असूनही भारताने चौथ्या डावात बाजी मारली. भारताच्या आक्रमणाने या फेरीत कमाल केली. गौतम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता रविवारी सायंकाळी ५ वाजता महिलांची, तर ७.३० वाजता पुरुषांची अंतिम फेरी सुरू होईल.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत