दुबई : भारतीय क्रिकेटला लाभलेल्या अमूल्य वरदानांपैकी एक म्हणजे जसप्रीत बुमरा. आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीने स्विंग, गती आणि सातत्य या त्रिसुत्रीच्या बळावर जगभरातील फलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या बुमराला मंगळवारी आयसीसीच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२४ या वर्षातील तिन्ही प्रकारांत मिळून सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून बुमराची निवड करण्यात आली. हा बहुमान मिळवणारा तो भारताचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. बुमराने ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड, इंग्लंडचा जो रूट आणि हॅरी ब्रूक यांना पिछाडीवर टाकून हा पुरस्कार काबिज केला. विजेत्या खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी देऊन गौरविण्यात येते.
३१ वर्षीय बुमराला सोमवारीच वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूच्या पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. त्यामध्ये मंगळवारी आणखी एका सर्वोच्च पुरस्काराची भर पडण्याची शक्यता होतीच. आता एकाच वर्षात सर्वोत्तम कसोटीपटू आणि सर्वोत्तम क्रिकेटपटू (एकदिवसीय, कसोटी व टी-२० मिळून) असे दोन किताब मिळवणारा बुमरा भारताचा चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी २००४मध्ये राहुल द्रविड, २०१६मध्ये रविचंद्रन अश्विन, तर २०१८मध्ये विराट कोहलीने कसोटीसह सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवला होता. तसेच बुमरा हा भारतासाठी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणारा एकंदर पाचवा खेळाडू ठरला. द्रविड (२००४), सचिन तेंडुलकर (२०१०), अश्विन (२०१६), विराट (२०१७, २०१८) यांनी अशी कामगिरी केली आहे.
दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आयसीसीकडून वार्षिक पुरस्कारांचे नामांकन जाहीर करण्यात येते. त्यानंतर जानेवारीत पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कामगिरीचा आढावा पुरस्कारासाठी घेतला जातो. विजेत्यांची निवड करताना परीक्षकांच्या मतांसह चाहत्यांच्या मतांनाही महत्त्व दिले जाते. परीक्षकांमध्ये आयसीसीचे पदाधिकारी, माजी क्रिकेटपटू, समालोचक, आयसीसी हॉल ऑफ फेमचे सदस्य यांचा समावेश असतो. गतवर्षी ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला होता. यंदा बुमराच्या स्वरूपात सहा वर्षांनी एखाद्या भारतीयाने हा मान मिळवला.
बुमराने २०२४ या वर्षात अवघ्या १३ कसोटींमध्ये सर्वाधिक ७१ बळी मिळवले. तसेच तिन्ही प्रकारांत मिळून बुमराने वर्षभरात फक्त १४.९२च्या सरासरीने धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील डिसेंबरपर्यंत झालेल्या ४ कसोटींमध्ये बुमराने ३० बळी पटकावले होते. तोच मग जानेवारीत मालिकावीर ठरला. बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीतील २०० बळींचा टप्पाही गाठला. तसेच पर्थ येथील कसोटीत बुमराने भारताचे नेतृत्व करताना दुहेरी छाप पाडली होती.
विशेष म्हणजे बुमरा वर्षभरात एकही एकदिवसीय लढत खेळला नाही. मात्र टी-२०मध्ये त्याने सातत्य कायम राखले. बुमराने वर्षभरात फक्त ८ टी-२० सामने खेळले आणि या सर्व लढती २०२४च्या टी-२० विश्वचषकातील होत्या. यामध्ये बुमराने १५ गडी बाद करून भारताला जगज्जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. बुमराच टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्यामुळेच हेड, रूट व ब्रूक असे आघाडीचे फलंदाज शर्यतीत असूनही बुमराला यावेळी पुरस्कारासाठी निवडण्यात आले.
तूर्तास, बुमरा पाठदुखीमुळे विश्रांतीवर असून लवकरच त्याच्या तंदुरुस्तीविषयी बीसीसीआयकडून माहिती देण्यात येईल. १९ फेब्रुवारीपासून आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार असल्याने त्यापूर्वी बुमरा भारतीय संघात परतावा, अशीच आशा कोट्यवधी भारतीय बाळगून आहेत.
२०२४ या वर्षातील बुमराची कामगिरी
- वर्षभरात कसोटीत सर्वाधिक ७१ बळी. तेसुद्धा फक्त १३ सामन्यांत आणि १४.९२च्या सरासरीने. दुसऱ्या क्रमांकावरील ॲटकिन्सनचे ५२ बळी.
- टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार (८ सामन्यांत १५ बळी).
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू.
- क्रिकेटच्या तिन्ही क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेण्यात यशस्वी.
- टी-२० विश्वचषकात पाकिस्तान तसेच अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निर्णायक स्पेल.
- पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत भारताचे यशस्वी नेतृत्व.
- इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ओली पोपला अविश्वसनीय चेंडू.
वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी आयसीसीने माझी निवड केल्यामुळे मी फार आनंदी आहे. लहानपणापासून क्रिकेट खेळताना अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळताना पाहिले आहे. २०२४ हे वर्ष संस्मरणीय ठरले. मात्र भारतासाठी टी-२० विश्वचषक जिंकणे सर्वाधिक अविस्मरणीय क्षण असेल. ओली पोपला विशाखापट्टणम येथील कसोटीत टाकलेला यॉर्कर माझ्यासाठी या वर्षातील सर्वोत्तम विकेट आहे. माझ्या कारकीर्दीने आताशी फक्त भरारी घेतली असून यापुढेही देशासाठी असेच योगदान देत राहीन.
- जसप्रीत बुमरा
महिलांमध्ये न्यूझीलंडच्या अमेलियाची बाजी
न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया कर महिलांमध्ये वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरली. डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारी अमेलिया ही न्यूझीलंडकडून हा पुरस्कार पटकावणारी आजवरची पहिलीच खेळाडू ठरली. तिने श्रीलंकेची चामरी अटापटू, आफ्रिकेची लॉरा वोल्वर्ड आणि ऑस्ट्रेलियाची सदरलँड यांच्यावर सरशी साधली. अमेलियाने २०२४मध्ये न्यूझीलंडला टी-२० विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तीच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिने १८ टी-२० सामन्यांत ३८७ धावा करण्यासह २९ बळीही मिळवले. तसेच एकदिवसीय प्रकारात तिने २६४ धावा करताना १४ बळी मिळवले.
दरम्यान, सोमवारी भारताच्या स्मृती मानधनाने एकदिवसीय प्रकारात वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरण्याचा मान मिळवला होता. तिने दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावले. मात्र यावेळी स्मृतीला सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी नामांकन लाभले नाही.