फोटो सौजन्य - एक्स (@rolandgarros)
क्रीडा

कार्लोस पुन्हा लाल बादशहा; टायब्रेकरपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात सिनरवर पाच सेटमध्ये वर्चस्व

रविवारी मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराझने आपणच लाल मातीचा नवा बादशहा असल्याचे पुन्हा दाखवून दिले. पहिल्या दोन सेटमध्ये पत्करलेला पराभव, तीन वेळा चॅम्पियनशीप पॉइंट वाचवण्याचा पराक्रम आणि तब्बल ५ तास, २९ मिनिटांच्या झुंज यांसारख्या विविध घडामोडींनी संस्मरणीय ठरलेल्या अंतिम सामन्यात...

Swapnil S

पॅरिस : फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत रविवारी मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराझने आपणच लाल मातीचा नवा बादशहा असल्याचे पुन्हा दाखवून दिले. पहिल्या दोन सेटमध्ये पत्करलेला पराभव, तीन वेळा चॅम्पियनशीप पॉइंट वाचवण्याचा पराक्रम आणि तब्बल ५ तास, २९ मिनिटांच्या झुंज यांसारख्या विविध घडामोडींनी संस्मरणीय ठरलेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अल्कराझने इटलीच्या अग्रमानांकित जॅनिक सिनरवर पाचव्या सेटनंतर टायब्रेकरमध्ये सरशी साधली.

२२ वर्षीय दुसऱ्या मानांकित अल्कराझने फिलिपे चॅट्रियर कोर्टवर झालेल्या महाअंतिम मुकाबल्यात २३ वर्षीय अग्रमानांकित सिनरवर ४-६, ६-७ (४-७), ६-४, ७-६ (७-३), ७-६ (१०-२) अशी मात केली. उभय खेळाडूंमधील ही लढत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक लांबलेला अंतिम सामना ठरला. अल्कराझने कारकीर्दीतील एकंदर पाचव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. तर सिनर प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाला. अल्कराझने २०२२मध्ये अमेरिकन ओपन, २०२३ व २०२४मध्ये विम्बल्डन, तर २०२४ व २०२५मध्ये फ्रेंच ओपन जिंकण्याची करामत केली आहे. त्यामुळे आधुनिक पिढीतील टेनिसचा तारा असे बिरुद अल्कराझ डौलाने मिरवत आहे. राफेल नदालचा वारसदार म्हणून तमाम स्पेनवासीयांसह जगभरातील चाहते त्याच्याकडे पाहतात. आता जुलै महिन्यात अल्कराझकडे विम्बल्डनची हॅटट्रिक साधण्याची संधी आहे.

उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचवर सिनरने वर्चस्व गाजवले होते. तर अल्कराझ लॉरेंझो मुसेट्टीला नमवून आला होता. दोन्ही खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत आमनेसामने येत होते. सिनर वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला होता. तसेच पहिले दोन सेट गमावल्यावर अल्कराझने आजवर एकही ग्रँडस्लॅम लढत जिंकलेली नव्हती. अशा स्थितीत सिनरचेच पारडे जड मानले जात होते. तिसरा सेट जिंकून अल्कराझने लढतीतील चुरस कायम राखली. चौथ्या सेटमध्ये मात्र सिनर एकवेळ ५-३ असा आघाडीवर होता. तसेच गेममध्येही त्याची गुणसंख्या ४०, तर अल्कराझची ० होती. त्यावेळी सिनरकडे त्याच गेममध्ये तीन वेळा चॅम्पियनशीप पॉइंट आला. मात्र अल्कराझने अफलातून खेळ करत प्रत्येक वेळी सिनरचा प्रयत्न हाणून पाडला. तो गेम वाचवण्यासह अल्कराझने पुढील गेममध्ये सिनरची सर्व्हिस ब्रेक केली. येथून मग अल्कराझने मागे वळून पाहिले नाही.

पाचव्या सेटमध्ये दोघांमध्ये ६-६ अशी बरोबरी असताना टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. यावेळी अल्कराझने सलग चार गुण मिळवून सिनरवर दडपण आणले. सिनरला अल्कराझने चुका करण्यास भाग पाडले. अखेरीस रेषेजवळून फोरहँडचा फटका लगावून अल्कराझने विजयावर शिक्कामोर्तब केले आणि तो कोर्टवरच कोसळला. अशक्यप्राय असा विजय मिळवल्याच्या भावना त्याच्या चेहऱ्यावर सहज दिसून येत होता. तर सिनरच्या हावभावावरून आपल्याकडून नेमका कुठे सामना निसटला, याचे उत्तर शोधण्यात तो व्यस्त असल्याचे जाणवले. भारतीय वेळेनुसार रात्री १२.३० पर्यंत रंगलेली ही लढत टेनिसप्रेमींना कायम स्मरणीत राहील, हे निश्चित.

- अल्कराझने नदालच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली. नदालने जेव्हा कारकीर्दीतील पाचवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले, त्यावेळी त्याचे वय २२ वर्षे, १ महिना व ३ दिवस असे होते. अल्कराझनेही रविवारी जेव्हा पाचव्या जेतेपदाला गवसणी घातली, तेव्हा त्याचे वय २२ वर्षे, १ महिना व ३ दिवस असे होते.

- कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ३ चॅम्पियनशीप पॉइंट वाचवणारा अल्कराझ हा पहिलाच पुरुष टेनिसपटू ठरला. यापूर्वी नोव्हाक जोकोव्हिचने २०१९च्या विम्बल्डन अंतिम फेरीत रॉजर फेडररविरुद्ध २ चॅम्पियनशीप पॉइंट वाचवले होते.

"कारकीर्दीतील अविस्मरणीय सामन्यांपैकी असा हा एक सामना होता. नदालच्या विक्रमाशी बरोबरी करणे कदाचित भाग्यात लिहिले असावे. त्याच्याप्रमाणेच टेनिसमध्ये स्वत:चे नाव उज्ज्वल करण्याचे माझे लक्ष्य आहे. सिनरसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यामुळे हा विजय फार खास आहे." - कार्लोस अल्कराझ

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video