@ICC
क्रीडा

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमनेसामने; विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक

खराब फॉर्मचा सामना करत असलेला इंग्लंड आणि दुखापतीशी झुंजत असलेला ऑस्ट्रेलिया हे दोन संघ शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने येणार आहेत.

Swapnil S

लाहोर : खराब फॉर्मचा सामना करत असलेला इंग्लंड आणि दुखापतीशी झुंजत असलेला ऑस्ट्रेलिया हे दोन संघ शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने येणार आहेत. ॲशेस मालिकेतील हे प्रतिस्पर्धी संघ स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत.

अलीकडच्या काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही संघ संघर्ष करत आहेत. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दोन मालिकांमध्ये श्रीलंकेने ०-२ असे आणि पाकिस्तानने १-२ असे पराभूत केले आहे.

इंग्लंडचा संघ सर्व फॉरमॅटमध्ये ब्रँडम मॅककुलम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. २०२३ च्या विश्वचषकानंतर या संघाने एकही एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला भारताने ०-३ अशी मात दिली. या मालिकेत यजमान संघाशी दोन हात करताना इंग्लंडचा संघ लटपटला.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ३-२ असे नमवले आहे. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली आहे. विश्वविजेत्या संघातील ५ प्रमुख खेळाडू संघातून बाहेर आहेत.

पॅट कमिन्स, जोश हेझलवुड आणि मिचेल स्टार्क हे वेगवान गोलंदाजीचे त्रिकुट दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे अष्टपैलू मिचेल मार्शही खेळणार नाही. कॅमेरॉन ग्रीनला दुखापत आणि मार्कस स्टॉयनिसची एकदिवसीय क्रिकेटमधून धक्कादायक निवृत्ती यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ चिंतेत आहे.

इंग्लंडने तीन वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे, जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि ब्रायडन कार्स या वेगवान तिकडीला आदिल रशीदच्या फिरकीची साथ मिळणार आहे.

इंग्लंडने युवा यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथला संघात स्थान दिले आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. फलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्टीवर बेन डकेट संघाला मजबूत सुरुवात करून देण्याच्या प्रयत्नात असेल.

आमच्याकडे प्रतिभा आहे

इंग्लंडचा संघ पहिला चॅम्पियन्स ट्रॉफी किताब जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. भारतामध्ये जे काही घडले, त्याची पर्वा आम्ही करत नाही. आम्हाला विश्वास आहे की आमच्याकडे प्रतिभा आहे, आमच्याकडे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, विजय मिळवून देणारे खेळाडू संघात आहेत, असे रशीद म्हणाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन प्रतिस्पर्धी संघ शनिवारी आमने-सामने येणार आहेत. या तगड्या लढतीने दोन्ही संघ स्पर्धेला सुरुवात करणार आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हर्टन, जेमी स्मिथ, ब्रेडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड, टॉम बँटन, गस ॲटकिन्सन, सकिब महमूद.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, सीन ॲबट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लबूशेन, जेक फ्रेसर, बेन ड्वारशुईस, तन्वीर संघा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्पोर्ट्स १८ वाहिनी, जिओहॉटस्टार ॲप

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल