क्रीडा

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची आजपासून सुरुवात; भारताला एकूण पाच संघ खेळवण्याची संधी

स्पर्धेमुळे उपस्थितांना जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

वृत्तसंस्था

बुद्धिबळ ऑलिम्पियाडला गुरुवारपासून सुरुवात होत असून डावपेचांची अहमहमिका पाहण्याची मेजवानीच यामुळे मिळणार आहे. भारताला खुल्या विभागात तीन आणि महिला विभागात दोन असे एकूण पाच संघ खेळवण्याची संधी मिळाली आहे. यंदा यजमान म्हणून भारताला प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या आयोजनाची संधी मिळाली असून स्पर्धा ही १० ऑगस्टपर्यंत चेन्नईजवळील महाबलीपुरम येथे होणार आहे.

या स्पर्धेमुळे उपस्थितांना जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

भारताने २००२मध्ये ‘फिडे’ विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. हैदराबाद येथे झालेल्या या स्पर्धेतही आघाडीचे अनेक बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. बुद्धिबळाच्या विकासासाठी सध्या भारतात पोषक परिस्थिती असल्याने जागतिक बुद्धिबळातील सर्वोत्तम देशांमध्ये भारताची गणना होत आहे.

जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या विदित गुजराथीचा खुल्या विभागातील भारताच्या ‘अ’ संघात समावेश असून तो पहिल्या पटावरील सामने खेळणार आहे. त्यामुळे त्याला प्रतिस्पर्धी संघांतील सर्वोत्तम खेळाडूच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.

भारताने विदितच्या नेतृत्वाखाली २०२०च्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यावेळी ही स्पर्धा प्रथमच ऑनलाइन स्वरूपात झाली होती.

आताच्या ऑलिम्पियाडमध्ये खुल्या विभागातील तिन्ही भारतीय संघांमध्ये केवळ ग्रँडमास्टर खेळाडूंचा समावेश असून जवळपास सर्वाचे २६००हून अधिक एलो गुण आहेत. त्यामुळे या विभागात अमेरिकेसह भारताला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. महिलांमध्ये भारताच्या ‘अ’ संघाला अव्वल मानांकन लाभले आहे. त्यामुळे खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा