Commonwealth Games 2026 : कामगिरी ढासळूनही नीरजसह भारताचे तिन्ही भालाफेकपटू अंतिम फेरीत X|afiindia
क्रीडा

Commonwealth Games 2026 : कामगिरी ढासळूनही नीरजसह भारताचे तिन्ही भालाफेकपटू अंतिम फेरीत

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्यासह भारताच्या तीन भालाफेकपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Swapnil S

ग्लासगो : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्यासह भारताच्या तीन भालाफेकपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी झालेल्या पात्रता फेरीत जोरदार आणि दिशा बदलणाऱ्या वाऱ्यामुळे कोणत्याही खेळाडूला ८४ मीटरची ऑटोमॅटिक क्वालिफिकेशन मर्यादा पार करता आली नाही. मात्र, अव्वल १२ खेळाडूंमध्ये स्थान मिळवत भारतीय त्रिकुटाने पदक फेरीत धडक मारली.

२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा २८ वर्षीय नीरज चोप्रा ७९.६१ मीटर फेकीसह पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर राहिला. रोहित यादव ७८.३७ मीटर फेकीसह नवव्या, तर यशवीर सिंग ७८.३६ मीटर फेकीसह १०व्या स्थानावर राहिला. नीरजने पहिल्या प्रयत्नात ७६.२८ मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ७९.६१ मीटर भाला फेकला. पहिल्या दोन प्रयत्नांतच अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाल्यामुळे त्याने तिसरा प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला.

१८ अंश सेल्सिअस तापमान आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे भालाफेकपटूंना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. पात्रता फेरीत केवळ चार खेळाडूंनाच ८० मीटरचा टप्पा ओलांडता आला. श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागे याने ८२.८४ मीटर फेकीसह अव्वल स्थान मिळवले, तर ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरने ८१.२९ मीटर फेकीसह दुसरे स्थान पटकावले. पाकिस्तानचा अर्शद नदीम (७८.६३ मीटर) सातव्या आणि त्रिनिदाद अँड टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट (७८.२६ मीटर) ११ व्या स्थानावर राहत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. २०१४ मधील सुवर्णपदक विजेता केनियाचा ज्युलियस येगो १४ व्या स्थानावर राहिल्याने बाहेर पडला.

हवामानाविषयी नीरज चोप्रा म्हणाला की, “भालाफेकपटूंसाठी ही परिस्थिती अजिबात योग्य नव्हती. थंडीसोबतच वारा चारी बाजूंनी वाहत होता, त्यामुळे कोणत्या दिशेने वारा येईल याचा अंदाज लावणे कठीण जात होते.” अंतिम फेरीत स्थान मिळवल्याचा आनंद असून तिथे चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य असल्याचे त्याने नमूद केले. पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या नीरजने जूनमध्ये दोहा लीगद्वारे पुनरागमन केले होते.

आज अंतिम फेरी

नीरज, रोहित, यश या तिघांना शुक्रवारी मध्यरात्री अंतिम फेरीत पदक पटकावण्याची संधी असेल. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२.४५ वाजता ही फेरी सुरू होईल. २०२२च्या राष्ट्रकुलमध्ये नीरज दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र आता पुन्हा तो सुवर्णपदक पटकावण्यास उत्सुक असेल. त्याला २०२४चा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम व श्रीलंकेच्या रुमेशकडून कडवे आव्हान मिळेल. तसेचा ग्रॅनडाचा अँडरसन पीटर्सही नीरजचा फार पूर्वीपासून कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उच्च न्यायालयातील कॅन्टिनवर FDA चा बडगा; FSSAI परवाना नसल्याचे उघड

ॲग्रीगेटर कंपन्यांना १ सप्टेंबरपर्यंतची मुदत; नोंदणी न केल्यास कठोर कारवाई

E20 च्या वापराने मायलेज घटण्याचा संभव; केंद्र सरकारची संसदेत कबुली

जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या अध्यक्षतेखाली 'सीसीएस'ची बैठक; पुरवठा साखळीवरील संकटावर मंथन

गंभीर नियमभंग असेल तरच होते कारवाई, "मी स्वतःला सिंघम मानत नाही"; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची विशेष मुलाखत