नवी दिल्ली : दोन जनरेशनमधील खेळाडूंमध्ये तुलना करणे आणि त्यात कोणता खेळाडू चांगला आहे याचा अंदाज लावणे हे अनावश्यक असल्याचे भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव म्हणाले. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांना वगळण्याचा बीसीसीआयच्या निवडकर्त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य यावर चर्चा करण्यास त्यांनी नकार दिला.
खेळाडूंमध्ये तुलना करू नका. तुम्ही एका जनरेशनची दुसऱ्या जनरेशनशी तुलना करू शकत नाही. त्याची आवश्यकताही नाही. सध्या खेळाडू दिवसाला ३०० धावा जमवत आहेत. आमच्या काळात असे होत नव्हते. त्यामुळे दोन जनरेशनमध्ये तुलना व्हायला नको, असे कपिल देव म्हणाले. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
निवडकर्त्यांच्या निवडीवर प्रश्न निर्माण करणे चुकीचे ठरेल. कारण त्यांनीही जयस्वाल आणि पंत यांना संघात स्थान न देण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेतला असेल, असे कपिल देव म्हणाले.
यशस्वी आणि पंत यांना मायदेशातील मालिकेत संघातून वगळण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का? या प्रश्नावर कपिल देव म्हणाले की, निवडकर्त्यांच्या निवडीवर मी कसे काही बोलू शकतो. मला वाटते की निवडकर्त्यांनी हा निर्णय विचारपूर्वक घेतला असावा. जर मी याबद्दल काही बोललो तर ते टिकात्मक होईल. त्यामुळे मला त्यांच्यावर टीका करायची नाही. निवडकर्त्यांनी विचारपूर्वक आणि धोरणात्मक निर्णय घेतले असतील.
रोहितच्या निवृत्तीचा निर्णय त्याच्यावरच सोडावा
रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्टार फलंदाजांनी ऑस्ट्रेलियात निराश केले. त्यांच्या निवृत्तीबाबत विचारले असता कपिल म्हणाले की, हा निर्णय त्यांच्यावर सोडला पाहिजे. ते खूप मोठे खेळाडू आहेत. जेव्हा त्यांना वाटेल की आता थांबायचे आहे, तेव्हा ते नक्कीच थांबतील असे कपिल म्हणाले.