PTI
क्रीडा

सतत बदलणारे धोरण नेमबाजांसाठी घातक! रायफल संघटनेच्या संघ निवडीवर जसपाल राणा यांची टीका

अनेक आशावादी प्रतिभांना ठेच लागली आहे, अशी टीका एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकांची कमाई करणाऱ्या मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रीय रायफल संघटनेचे संघ निवड धोरण सतत बदलत असते. नेमबाजांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या धोरणात सातत्य नसेल, तर ते नेमबाजांसाठी घातक आहे. यावेळी अनेक आशावादी प्रतिभांना ठेच लागली आहे, अशी टीका एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकांची कमाई करणाऱ्या मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी केली आहे.

जसपाल राणा यांनी २००६ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई केली होती. राष्ट्रीय संघटनेने अगदी ऐनवेळी आपल्या धोरणात बदल करून राष्ट्रीय शिबीर आणि चाचणीदरम्यान नेमबाजांना त्यांचा वैयक्तिक प्रशिक्षक नेण्यास बंदी केली, असे आयत्यावेळी केलेले बदल नेमबाजांसाठी घातक ठरू शकतात, असे राणा यांचे म्हणणे आहे.

राणा यांचा, यावेळी संघटनेवर सरकारचे नियंत्रण असायला हवे, असा सूर होता. “राष्ट्रीय महासंघ सहा महिन्यांनी आपले धोरण बदलत असते. दर सहा महिन्यांनी असा काय फरक पडणार आहे. म्हणूनच मी क्रीडामंत्र्यांची भेट घेऊन त्यांना संघटनेकडून धोरण मिळविण्यास सांगितले आहे. मग, त्यांना काय योग्य, काय अयोग्य हे ठरवू द्या आणि मग ते धोरण अंतिम करावे,” असे राणा म्हणाले.

संघटनेच्या अशाच बदलत्या धोरणामुळे अनेक माजी नेमबाज एखाद्या स्पर्धेतच चमकून आता कुठे गायब झालेत हे कुणालाच माहीत नाही. याचे उदाहरण देताना राणा यांनी पिस्तूल नेमबाज सौरभ चौधरी आणि जितू राय यांचा उल्लेख केला. हे दोन्ही नेमबाज त्यांच्या सर्वोत्तम लयीत होते, तेव्हा त्यांना केवळ धोरणातील असातत्यामुळे दूर राहावे लागले.

“आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही जा अंतिम फेरी ही आठ जणांमध्येच होते. महासंघाने मात्र यावेळी केवळ पाचच नेमबाजांमध्ये निवड चाचणी घेतली. यावरून तेव्हाच महासंघाला टीकेला सामोरे जावे लागले होते. आपल्याकडे ऑलिम्पिक आणि जागतिक पदक विजेत्यांना संरक्षण देण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. मनूने पॅरिसमध्ये दोन पदके जिंकली असली, तरी विश्रांतीनंतर परत येताना संघात स्थान मिळविण्यासाठी मनूला संघर्ष करावा लागेल,” अशी भीतीही राणा यांनी व्यक्त केली.

मनू आणि माझे नाते इतरांसाठी आदर्श

ऑलिम्पिक स्पर्धेतही राणा यांना मनूची कामगिरी प्रेक्षकांमधूनच बघावी लागली. त्यांना मनूबरोबर थांबण्यासाठी आणि रेंजवर प्रवेश करण्यासाठी आवश्यक अधिस्वीकृती नव्हती. “मला आश्चर्य वाटले नाही. महासंघाच्या अशा धोरणांची आता आम्हाला सवय झाली आहे. मी मनूबरोबर नसल्याचा काही एक परिणाम झाला नाही. मनू आणि माझ्यात इतके सामंजस्य आहे की, आम्हाला वेगळे बोलायची गरजच भासत नाही. आमचे नाते इतरांसाठी आदर्श आहे. माझ्या मते चांगला प्रशिक्षक असा असायला हवा,” असेही राणा म्हणाले.

Maharashtra assembly elections 2024: मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांची आश्वासने

Maharashtra assembly elections 2024 : चेंबूरमध्ये दोन मित्रांत लढत! शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना

मुख्यमंत्र्यांचे समोसे कुणी केले फस्त? सीआयडी चौकशी सुरू

पालिकेला नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश; दाम्पत्याला हायकोर्टाचा दिलासा

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक