नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आणि आक्रमक फलंदाज आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर व्हावे लागले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १८ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना आयुष म्हात्रेच्या डाव्या पायाचे स्नायू ताणले गेले. या गंभीर दुखापतीमुळे तो उर्वरित हंगामात खेळू शकणार नसल्याचे फ्रँचायझीने मंगळवारी स्पष्ट केले.
विरारच्या आयुष म्हात्रे याला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान ६ ते १२ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयुष म्हात्रे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरला होता. अवघ्या १२ चेंडूत ३० धावा फटकावून तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र, पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दुसरी धाव घेताना त्याच्या पायाचे स्नायू दुखावले गेले. वेदना होत असतानाही त्याने काही चेंडूंचा सामना केला, मात्र त्यानंतर लगेचच तो बाद झाला.
चेन्नई संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांनी म्हात्रेची दुखापत गंभीर असल्याचे सांगितले असून त्याची अनुपस्थिती सीएसकेला चांगलीच जाणवणार आहे. आयुषच्या अनुपस्थितीत उर्विल पटेलला संधी मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, चेन्नई संघव्यवस्थापनाने आयुषऐवजी बदली खेळाडूची घोषणा तूर्तात तरी केलेली नाही.
‘सीएसके’साठी यंदाचा हंगाम दुखापतींच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरत आहे. गोलंदाज खलील अहमद आणि नॅथन एलिस यांच्यानंतर म्हात्रे हा स्पर्धेतून बाहेर पडणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे, माजी कर्णधार एम. एस. धोनी देखील सरावादरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीमुळे अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या ‘सीएसके’चा पुढील सामना गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.
अश्विनची चेन्नईवर टीका
यंदाच्या हंगामात आयुषने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ६ सामन्यांत १७७च्या सरासरीने २०१ धावा केल्या आहेत. आयुषचा फॉर्म ही चेन्नईसाठी जमेची बाजू होती. मात्र आता तो नसल्यामुळे चेन्नईला डावपेचांमध्ये बदल करावे लागणार आहेत. दरम्यान ‘आयुषला सामन्याआधीही मांडीच्या स्नायूंचा त्रास जाणवत होता. मात्र तरीही त्याला फलंदाजीला पाठवण्यात आले. त्याला चालताना अवघड जात असताना, खेळवण्यात आले. यामुळे त्याची दुखापत चिघळू शकते, हे करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. ही परिस्थिती अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती,’ अशी टीका भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने चेन्नईवर केली.