नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदा जेतेपदाच्या प्रबळ दावेदारासारखा खेळत आहे. त्यामुळे गेल्या लढतीतील पराभवाला मागे सारून दिल्लीचे शिलेदार पुन्हा गुणतालिकेत अग्रस्थान पटकावण्यासाठी आतुर आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे कोटला) दिल्लीची सातत्याने संघर्ष करणाऱ्या राजस्थान रॉयल्सशी गाठ पडेल.
अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने सलग चार सामने जिंकून दिमाखात सुरुवात केली होती. मात्र मुंबईविरुद्ध कोटला येथे घरच्याच मैदानात खेळताना दिल्लीला १२ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाच सामन्यांतील चार विजयांच्या ८ गुणांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत तूर्तास स्थानी आहे. आता बुधवारी पुन्हा एकदा घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना दिल्ली विजयपथावर परतेल, अशी आशा आहे. कोटलाची खेळपट्टी फलंदाजांना पोषक असून येथे दुसऱ्या डावात दवही मोठ्या प्रमाणात येते. तसेच सीमारेषाही फारशी लांब नसल्याने येथे २०० धावांचा पाठलागही केला जाऊ शकतो. मात्र दुसऱ्या डावात चेंडू बदलण्यात येत असल्याने फिरकीपटू सामन्यात रंगत निर्माण करू शकतात.
दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने ६ पैकी २ सामने जिंकले आहेत. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यावर राजस्थानने चेन्नई व पंजाबला हरवले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना गुजरात व बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राजस्थान तूर्तास गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. गुणवान खेळाडूंचा भरणा असून सांघिक कामगिरी उंचावण्यात राजस्थान अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता दिल्लीला ते कितपत झुंज देणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
करुणच्या समावेशामुळे दिल्लीची फलंदाजी बळकट
तीन वर्षांनी आयपीएलमध्ये परतलेल्या करुणने मुंबईविरुद्ध ४० चेंडूंत ८९ धावांची घणाघाती खेळी साकारली. मात्र दुर्दैवाने तो दिल्लीला विजय मिळवून देऊ शकला नाही. करुणच्या समावेशामुळे दिल्लीची फलंदाजी आणखी बळकट झाली आहे. जेक फ्रेसरला वगळून फॅफ डुप्लेसिस तंदुरुस्त असल्यास त्याचे पुनरागमन पक्के असेल. त्याशिवाय के. एल. राहुल, आशुतोष शर्मा लयीत आहेत. कर्णधार अक्षरला मात्र अद्याप छाप पाडता आलेली नाही. कुलदीप यादव आणि विपराज निगम ही फिरकी जोडी दिल्लीसाठी सातत्याने प्रभाव कामगिरी करत आहे. मिचेल स्टार्कला मुकेश कुमार व मोहित शर्मा यांची साथ लाभणे आवश्यक आहे. कागदावर दिल्लीचा संघ वरचढ असून त्यांनी लौकिकाला साजेसा खेळ केला, तर राजस्थानवर ते सहज वर्चस्व गाजवू शकतात.
पराग, सॅमसनची राजस्थानला चिंता
कर्णधार सॅमसन व पराग यांना यंदाच्या हंगामात आतापर्यंत छाप पाडता आलेली नाही. सॅमसनने सहा सामन्यांत एका अर्धशतकासह १९३, तर परागने तितक्याच लढतींमध्ये फक्त १६५ धावा केल्या आहेत. तसेच फलंदाजांचा सातत्याने क्रम बदलणेही संघासाठी धोक्याचे ठरत आहे. नितीश राणा, ध्रुव जुरेल, शिम्रॉन हेटमायर यांनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे. गोलंदाजीत वानिंदू हसरंगा तंदुरुस्त असल्यास त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. महीष थिक्षणा व कुमार कार्तिकेय फिरकीची धुरा वाहतील. मात्र वेगवान माऱ्यात जोफ्रा आर्चरला पुरेशी साथ लाभलेली नाही. तुषार देशपांडेला वगळून आकाश मढवालला संधी दिली जाऊ शकते. संदीप शर्मा अखेरच्या षटकांत गोलंदाजी करण्यात पटाईत आहे.
२००८मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवणाऱ्या राजस्थानने त्यानंतर फक्त २०२२मध्ये अंतिम फेरी गाठली. गेल्या वर्षी या संघाला क्वालिफायर-२मध्ये पराभव पत्करावा लागला. लिलावात काही अनुभवी खेळाडूंना सोडून या संघांने प्रामुख्याने भारतीय फलंदाजांवर अधिक विश्वास दर्शवला. हेटमायर वगळता एकही विदेशी फलंदाज राजस्थानकडे नाही. याचाच फटका संघाला बसत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. मात्र राजस्थान अद्यापही पलटवार करून बाद फेरी गाठू शकते.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या २९ सामन्यांपैकी राजस्थानने १५, तर दिल्लीने १४ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये नेहमीच कडवी झुंज पाहायला मिळाली आहे. बुधवारीही रंगतदार लढत अपेक्षित आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर मॅकगर्क, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, थंगारासू नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक, आकाश मढवाल.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप