साऊथहॅम्पटन : अनुभवी डावखुरी फलंदाज दीप्ती शर्माने (६४ चेंडूंत नाबाद ६२ धावा) बुधवारी मध्यरात्री झुंजार अर्धशतकी खेळी साकारली. तिला मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज (५४ चेंडूंत ४८) आणि फिरकीपटू स्नेह राणा (३१ धावांत २ बळी) यांची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ४ गडी व १० चेंडू राखून पराभव केला.
द रोझ बाऊल स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या लढतीत इंग्लंडने दिलेल्या २५९ धावांचा पाठलाग भारताने ४८.२ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात केला. एकदिवसीय प्रकारात भारताने धावांचा पाठलाग करताना मिळवलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम विजय ठरला. यापूर्वी २०२१मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६५ धावांचे लक्ष्य हासिल केले होते. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना शनिवारी लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
यंदा सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात भारतात महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी भारत संघबांधणी करत आहे. मे महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासह झालेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारताने सहज जेतेपद पटकावले. आता या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळेल.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकांत ६ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारली. २१ वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडने टॅमी ब्युमाँट (५) व एमी जोन्स (१) यांना लवकर माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार नॅट ब्रंट (४१) व एमा लम्बने (३९) तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भर घातली. फिरकीपटू राणाने या दोघींना माघारी पाठवले. त्यानंतर सोफिया डंकली आणि एलिस रिचर्ड्स यांची जोडी जमली.
या दोघींनी पाचव्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी रचली. सोफियाने ९ चौकारांसह ९२ चेंडूंत ८३ धावा करताना सहावे अर्धशतक साकारले, तर रिचर्ड्सने दोन चौकारांसह ७३ चेंडूंत ५३ धावा करत दुसऱ्यांदा अर्धशतकाची वेस ओलांडली. त्यामुळे इंग्लंडने ४ बाद ९७ अशी स्थिती असतानाही अडीचशे धावांचा पल्ला गाठला. श्री चरिणीने रिचर्ड्सला बाद करून ही जोडी फोडली, तर अमनजोत कौरने अखेरच्या षटकात सोफियाचा अडसर दूर केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना (२८) व प्रतिका रावल (३६) यांनी आक्रमक सुरुवात करताना ८ षटकांत ४८ धावा फलकावर लावल्या. मात्र स्मृती बाद झाल्यावर भारताचा डाव काहीसा घसरला. कर्णधार हरमनप्रीत (१७) व हरलीन देओल (२७) मोठी खेळी साकारू शकले नाहीत. मग ४ बाद १२४ अशी स्थिती असताना दीप्तीला सहाव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. दीप्ती व जेमिमा यांनी पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भर घातली. दीप्तीने तिसरे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. लॉरेन फिलरने जेमिमाला बाद केले. मात्र अमनजोत (नाबाद २०) व दीप्ती यांनी ४९व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
g इंग्लंड : ५० षटकांत ६ बाद २५८ (सोफिया डंकली ८३, एलिस रिचर्ड्स ५३; स्नेह राणा २/३१) पराभूत वि. g भारत : ४८.२ षटकांत ६ बाद २६२ (दीप्ती शर्मा नाबाद ६२, जेमिमा रॉड्रिग्ज ४८; चार्ली डीन २/५२)