नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाची (डब्ल्यूएफआय) निवडणूक बेकायदेशीर ठरवावी यासाठी बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत काडियान यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देण्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने क्रीडा मंत्रालय आणि ‘डब्ल्यूएफआय’ यांना नोटीस पाठवली आहे.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सचिन दत्त यांनी ही नोटीस बजावली. या प्रकरणी न्यायालयाने क्रीडा मंत्रालयाचे वकील अनिल सोनी यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्याची तयारी दाखवली. याची पुढील सुनावणी आता ७ मार्च रोजी होणार आहे.
कुस्तीपटूंची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांनी महासंघाची निवडणूक ही क्रीडा आचारसंहितेचे उल्लंघन करून घेण्यात आली असल्याने ती बेकायदेशीर ठरवावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर याचिकेत भारतीय कुस्ती महासंघावर अनेक गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. कुस्ती महासंघाने अनेकदा जाणीवपूर्वक क्रीडा मंत्रालय आणि हंगामी समितीने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले आहे. याचा भारतीय कुस्तीपटूंच्या कारकीर्दीवर विपरीत परिणाम झाला असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.