थरारानंतर जोकोव्हिच-अल्कराझ अंतिम फेरीत! दोघांचीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर पाच सेटमध्ये सरशी; सिनर, झ्वेरेव्हचे आव्हान संपुष्टात Photo : X
क्रीडा

थरारानंतर जोकोव्हिच-अल्कराझ अंतिम फेरीत! दोघांचीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर पाच सेटमध्ये सरशी; सिनर, झ्वेरेव्हचे आव्हान संपुष्टात

विश्वभरातील तमाम टेनिसप्रेमींनी शुक्रवारी दोन दर्जेदार आणि तितक्याच थरारक लढतींचा आनंद लुटला. सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेता सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना अनुक्रमे इटलीचा यानिक सिनर व जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांना धूळ चारली.

Swapnil S

मेलबर्न : विश्वभरातील तमाम टेनिसप्रेमींनी शुक्रवारी दोन दर्जेदार आणि तितक्याच थरारक लढतींचा आनंद लुटला. सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेता सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना अनुक्रमे इटलीचा यानिक सिनर व जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांना धूळ चारली. त्यामुळे आता रविवारी रंगणाऱ्या महामुकाबल्यात कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागून असेल.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या ११४व्या पर्वाला गेल्या आठवड्यात प्रारंभ झाला. यंदा उद्घाटन सोहळ्यासाठी टेनिसच्या दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा म्हणून ऑस्ट्रेलियन ओपनला ओळखले जाते. यंदा १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. गतवर्षी या स्पर्धेत इटलीचा यॅनिक सिनर व अमेरिकेची मॅडीसन कीझ यांनी जेतेपद मिळवले होते. यंदा पुरुष एकेरीत अल्कराझ, तर महिलांमध्ये बेलारूसची आर्यना सबालेंका यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

दरम्यान, रॉड लेव्हर एरिना येथे शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात अग्रमानांकित अल्कराझने तिसऱ्या मानांकित झ्वेरेव्हला ६-४, ७-६ (७-५), ६-७ (३-७), ६-७ (४-७), ७-५ असे पाच सेटमध्ये पराभूत केले. २२ वर्षीय अल्कराझने तब्बल ५ तास आणि २७ मिनिटांच्या कडव्या झुंजीनंतर झ्वेरेव्हवर सरशी साधली. अल्कराझच्या नावावर सहा ग्रँडस्लॅम जेतेपदे असली, तरी त्याने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. तसेच गतवर्षी झ्वेरेव्हनेच उपांत्यपूर्व फेरीत अल्कराझला या स्पर्धेत नमवले होते. यावेळी अल्कराझने त्या पराभवाचा वचपा काढतानाच पहिल्या ऑस्ट्रेलियन जेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे.

अल्कराझला आता करियर स्लॅम पूर्ण करण्यासाठी रविवारी जोकोव्हिचला नमवावे लागेल. कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा किमान एकदा जिंकल्यावर खेळाडूचे करियर स्लॅम पूर्ण होते. अल्कराझने फ्रेंच (२०२४, २०२५), विम्बल्डन (२०२३, २०२४), अमेरिकन ओपन (२०२२, २०२५) प्रत्येकी दोन वेळा जिंकली आहे. उपांत्य लढतीत दुसऱ्या सेटनंतर अल्कराझ काहीसा चाचपडतानाही दिसला. एकवेळ तो लढत अर्धवट सोडून माघारी परतेल, असे वाटले. मात्र वेळीच उपचार घेऊन अल्कराझने पुनरागमन केले. २८ वर्षीय झ्वेरेव्हला मात्र कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात चौथा मानांकित जोकोव्हिच आणि द्वितीय मानांकित सिनर आमनेसामने आले. सिनर सध्या फॉर्मात असल्याने अनेकांनी तोच विजयी ठरेल, असे भाकीतही वर्तवले होते. त्यातच जोकोव्हिच उपांत्यपूर्व लढतीत दोन सेट पिछाडीवर असताना प्रतिस्पर्धी खेळाडूने दुखापतीमुळे माघार घेतल्याने उपांत्य फेरीत दाखल झाला होता. मात्र जोकोव्हिचने अनुभव पणाला लावत तब्बल ४ तास व ९ मिनिटांच्या संघर्षानंतर सिनरवर ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ अशी मात केली.

२४ वर्षीय सिनरने २०२४ व २०२५मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले होते. मात्र यंदा त्याची हॅटट्रिक हुकली. तर ३८ वर्षीय जोकोव्हिच आता विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे. जोकोव्हिचने २०२३मध्ये अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांतील आठ ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये अल्कराझ व सिनर यांनीच प्रत्येकी चार विजेतेपद काबिज केले. आता सिनरचा प्रतिकार मोडीत काढल्यानंतर रविवारी जोकोव्हिच अल्कराझचा विजयरथही रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

जोकोव्हिचने तब्बल ११व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली आहे, तर अल्कराझने प्रथमच या स्पर्धेत इथवर मजल मारली. त्यामुळे दोघांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

स्पर्धेतील सर्वाधिक रंगलेला सामना

अल्कराझ-झ्वेरेव्ह यांच्यातील उपांत्य लढत तब्बल ५ तास २७ मिनिटे रंगली. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखादा उपांत्य सामना इतका वेळ रंगला. यापूर्वी २००९मध्ये राफेल नदाल आणि फर्नांडो वर्डास्को यांच्यातील उपांत्य लढत ५ तास १४ मिनिटे रंगली होती. तब्बल १७ वर्षांनी हा विक्रम मोडीत निघाला.

सबालेंका-रायबॅकिनामध्ये जेतेपदासाठी झुंज

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत शनिवारी बेलारूसची अग्रमानांकित आर्यना सबालेंका आणि कझाकस्तानची एलिना रायबॅकिना यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. सबालेंकाने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली असून तिला कारकीर्दीत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे, तर रायबॅकिनाने दुसऱ्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २७ वर्षीय सबालेंकाने गुरुवारी उपांत्य फेरीत १२व्या मानांकित एलिना स्विटोलिनाला ६-२, ६-३ अशी सहज धूळ चारली. सबालेंकाने २०२३ व २०२४मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवले होते. तर गतवर्षी तिला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. २६ वर्षीय रायबॅकिनाने अमेरिकेच्या सहाव्या मानांकित जेसिका पेगुलावर ६-३, ७-६ (९-७) असे वर्चस्व गाजवले. रायबॅकिनाला आता कारकीर्दीतील पहिले ऑस्ट्रेलियन जेतेपद खुणावत आहे.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

Budget 2026 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? उद्या सादर होणारं बजेट कितवं? जाणून घ्या

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश