किशनची शानदार शतकी खेळी; पूर्व विभाग ४ बाद ३८५ धावा; ईश्वरन, मोहन, कुशाग्र यांची अर्धशतके; वैभवचीही फटकेबाजी X
क्रीडा

किशनची शानदार शतकी खेळी; पूर्व विभाग ४ बाद ३८५ धावा; ईश्वरन, मोहन, कुशाग्र यांची अर्धशतके; वैभवचीही फटकेबाजी

Duleep Trophy 2026 : कर्णधार इशान किशनच्या १३५ चेंडूंतील नाबाद १११ धावांच्या जोरावर पूर्व विभागाने दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण विभागाविरुद्ध ७९ षटकांत ४ बाद ३८५ धावांची भक्कम मजल मारली आहे.

Swapnil S

चेन्नई : कर्णधार इशान किशनच्या १३५ चेंडूंतील नाबाद १११ धावांच्या जोरावर पूर्व विभागाने दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण विभागाविरुद्ध ७९ षटकांत ४ बाद ३८५ धावांची भक्कम मजल मारली आहे.

चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रविवारपासून सुरू झालेल्या या सामन्यात दक्षिण विभागाची ढिसाळ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा पूर्व विभागाने पुरेपूर फायदा घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किशन आणि कुमार कुशाग्र (६३) क्रीझवर कायम होते. या पाचव्या जोडीने अवघ्या २६.४ षटकांत १४४ धावांची नाबाद भागीदारी रचली आहे.

पूर्व विभागाकडून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (४४), अभिमन्यू ईश्वरन (७२) आणि शिखर मोहन (८५) यांनीही मोलाचे योगदान दिले. ईश्वरन आणि सूर्यवंशी यांनी अवघ्या १४ षटकांत १०० धावांची सलामी देत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. १४७ धावांवर ३ गडी गमावल्यानंतर पूर्व विभाग काहीसा अडचणीत सापडला होता. मात्र, किशन आणि २१ वर्षीय शिखर मोहन यांनी चौथ्या गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. मोहनचे शतक १५ धावांनी हुकले. मिलिंदच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला.

आपल्या १३५ चेंडूंच्या खेळीत १४ चौकार आणि १ षटकार मारणाऱ्या किशनने आक्रमकता आणि संयमाचा सुरेख मेळ घातला. ७१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढील ५० धावा त्याने ५१ चेंडूंत कुटल्या. १००वा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या श्रेयस गोपाळच्या चेंडूवर चौकार मारत इशानने १०वे प्रथम श्रेणी शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पाही पार केला.

दुसऱ्या बाजूला दक्षिण विभागाचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. मोहम्मद सिराजची कामगिरी निराशाजनक राहिली. सिराजने १४ षटकांत एकही बळी न घेता ९६ धावा लुटल्या. सोमवारी दक्षिण विभागाच्या गोलंदाजांनी उर्वरित ६ फलंदाज लवकर बाद केले नाहीत, तर त्यांना पहिल्या डावातच मोठ्या धावसंख्येला सामोरे जावे लागेल.

तिघांची तारेवरची कसरत

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पाच दिवसांच्या अंतिम सामन्यानंतर लगेचच दिल्लीत १३ तारखेपासून अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेशी जुळवून घेणे आव्हानात्मक असेल, असे मत इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी व्यक्त केले आहे. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अनुक्रमे पूर्व विभाग आणि दक्षिण विभागाचे नेतृत्व करत असलेल्या या दोन्ही खेळाडूंनी या बदलासाठी स्वतःला तयार ठेवले आहे. पूर्व विभागाचा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी यालाही या सामन्यानंतर लगेच भारतीय संघात दाखल व्हावे लागेल. “फॉरमॅटमधील हा बदल कसा स्पष्ट करावा हे मला माहित नाही, परंतु आपण कोणता फॉरमॅट खेळत आहोत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे,” असे किशनने सांगितले. “कसोटी सामना खेळल्यानंतर अचानक पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करावी लागणे किंवा देशांतर्गत संघात वेगळी भूमिका बजावणे कठीण असते. परंतु व्यावसायिक खेळाडू म्हणून परिस्थितीशी जुळवून घेणे हे आमचे कर्तव्य आहे,” असेही त्याने नमूद केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पाणीही महागणार! BMC त पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या हालचाली; महसूलवाढीसाठी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता, प्रस्ताव लवकरच आयुक्तांच्या मंजुरीसाठी

Mumbai : लालबाग, परळचे पदपथ झाले मोकळे; बेकायदा ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर हटवले; सलग दोन दिवस केली कारवाई

'डीजे'विरोधात जनआक्रोश; हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा

दिल्लीत इमारत कोसळली; ४ ठार, ५ गंभीर

MPSC Paper Leak: ...तर आयोगातल्या व्यक्तीलाही शिक्षा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन