लुसाने : भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि दिग्गज खेळाडू पीआर श्रीजेश यांनी वर्ष २०२४ साठी एफआयएच प्लेयर ऑफ द इयर आणि गोलकीपर ऑफ द इयर या पुरस्कारांवर नाव कोरले. ओमानमध्ये झालेल्या ४९व्या एफआयएच संवैधानिक काँग्रेसमध्ये या पुरस्काराला मान्यता मिळाली.
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने नेदरलँड्सच्या जोप डी मोल आणि थिरी ब्रिंकमन, जर्मनीच्या हॅनेस मुलर आणि इंग्लंडच्या झेंक वॉलेस यांना मागे टाकत सर्वोच्च पुरस्कारावर मोहोर उमटवली. हरमनप्रीतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० गोल मारत चमकदार कामगिरी केली होती. श्रीजेशने नेदरलँडचा पिरमिन ब्लॅक, स्पेनचा लुईस कॅलझाडो, जर्मनीचा जीन पॉल डॅनबर्ग आणि अर्जेंटिनाचा टॉमस सैंटियागो यांच्यावर मात करत गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला.
एफआयएचच्या अन्य पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून नेदरलँड्सची यिब्बी जॅनसेन, वर्षातील सर्वोत्तम महिला गोलकीपर म्हणून चीनची ये जिआओ, वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून पाकिस्तानचा सुफयान खान, महिला उदयोन्मुख खेळाडू म्हणून अर्जेंटिनाची झो डियाझ, वर्षातील सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक म्हणून नेदरलँड्सचा जेरोएन डेल्मी, वर्षातील सर्वोत्तम महिला प्रशिक्षक म्हणून अॅलिसन अन्नान, वर्षातील सर्वोत्तम पुरुष पंच म्हणून ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह रॉजर्स, वर्षातील सर्वोत्तम महिला पंच म्हणून स्कॉटलंडची सारा विल्सन यांचा समावेश होता.
एवढा मोठा पुरस्कार जिंकल्याबद्दल सर्वप्रथम एफआयएचचे आभार मानतो. ऑलिम्पिकनंतर जेव्हा मायदेशात परतलो तो क्षण भारावून टाकणारा होता. माझ्या सहकाऱ्यांमुळेच मी हे यश संपादन करू शकलो. तुम्हा सर्वाशिवाय यापैकी काहीही शक्य झाले नसते. - हरमनप्रीत सिंग, कर्णधार, भारतीय पुरुष हॉकी संघ
पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला. खेळाडू म्हणून माझ्या कारकीर्दीतील या शेवटच्या सन्मानाबद्दल मनापासून आभार. हॉकी इंडियाचे मिळालेल्या समर्थन आणि मार्गदर्शनासाठी मनापासून आभार. - पीआर श्रीजेश, गोलकीपर