नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील ‘सुपरस्टार कल्चर’ बंद करण्याची गरज आहे. खेळाडूला त्याच्या नावावर अथवा पूर्वपुण्याईवर सातत्याने संधी देणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे जे कामगिरी करत आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो, अशी स्पष्ट प्रतिक्रिया भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली अपयशी ठरूनही सातत्याने त्याला संधी देण्यात आली. हरभजनने याद्वारे कोहलीवरच अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. “भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच एकामागून एक तारांकित खेळाडू उदयास आले. मात्र सध्याची गरज पाहता ही प्रथा बंद करावी लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे अपयश बाजूला सारून आता जूनमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या अथवा लयीत असलेल्या खेळाडूंनाच संधी द्यावी. ‘सुपरस्टार’ खेळाडूंना अन्य खेळाडूंप्रमाणेच न्याय देण्याची आवश्यकता आहे,” असे हरभजनने यूट्यूबवरील मुलाखतीत सांगितले.
त्याशिवाय पाचव्या कसोटीत वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टी असूनही दोन फिरकीपटू खेळवण्याच्या निर्णयावर हरभजनने टीका केली. तसेच बुमराला या मालिकेत संघ व्यवस्थापनाने पाचही लढतींमध्ये उसाचा रस काढल्याप्रमाणे पिळून काढले, असे मत त्याने नोंदवले.
“ड्रेसिंग रूममध्ये असलेले अथवा संघ निवडीत मोलाची भूमिका बजावणारे खेळपट्टी पाहून खेळाडूंची निवड करत नसावेत, असे मला वाटते. कारण पाचव्या कसोटीत दोन फिरकीपटूंची गरज नव्हती. बुमरावर अपेक्षेपेक्षा जास्त विसंबून राहून संघ व्यवस्थापनाने त्याच्या शरीराची काळजी घेतली नाही. याचा फटका पाचव्या कसोटीतील दुसऱ्या डावात बसला,” असे हरभजन म्हणाला.