Photo : X
क्रीडा

पुन्हा मॅक्सवेलची मॅजिक; ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर सरशी; टी-२० मालिका जिंकली

स्वबळावर कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने शनिवारी रात्री पुन्हा एकदा त्याची जादू दाखवली. संघ दडपणात असताना निर्णायक तिसऱ्या टी-२० सामन्यात मॅक्सवेलने ३६ चेंडूंत नाबाद ६२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर २ गडी व १ चेंडू राखून सरशी साधतानाच टी-२० मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

Swapnil S

सिडनी : स्वबळावर कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने शनिवारी रात्री पुन्हा एकदा त्याची जादू दाखवली. संघ दडपणात असताना निर्णायक तिसऱ्या टी-२० सामन्यात मॅक्सवेलने ३६ चेंडूंत नाबाद ६२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर २ गडी व १ चेंडू राखून सरशी साधतानाच टी-२० मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

कॅझली स्टेडियम, कैर्न्स येथे झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना डेवाल्ड ब्रेव्हिसच्या (२६ चेंडूंत ५३ धावा) आणखी एका घणाघाती खेळीमुळे आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारली. त्याला ऱ्हासी वॅन डर दुसेन (नाबाद ३८) व ट्रिस्टन स्टब्स (२५) यांची उत्तम साथ लाभली. कर्णधार एडीन मार्करमने (१) निराश केले. ऑस्ट्रेलियासाठी नॅथन एलिसने ३, तर झाम्पा व जोश हेझलवूडने प्रत्येकी २ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श व ट्रेव्हिस हेड यांनी ४८ चेंडूंत ६६ धावांची सलामी नोंदवली. मार्शने ३ चौकार व ५ षटकारांसह ३७ चेंडूंत ५४ धावा करताना १०वे अर्धशतक साकारले. मात्र नवव्या षटकात हेड (१९) बाद झाला व ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. पाठोपाठ मार्श, जोश इंग्लिस (०), कॅमेरून ग्रीन (९) हेसुद्धा बाद झाल्याने ते ४ बाद ८८ अशा स्थितीत होता.

मात्र सहाव्या क्रमांकावरील मॅक्सवेलने ८ चौकार व २ षटकारांसह १२वे टी-२० अर्धशतक साकारून संघाच्या आशा कायम राखल्या. त्याला टिम डेव्हिडची (१७) थोडीशी साथ लाभली. १४व्या षटकात १२२ धावसंख्येवर डेव्हिड व आरोन हार्डी (१) बाद झाल्यावर मॅक्सवेलनेच १६३ पर्यंत संघाला नेले. मग कॉर्बिन बोशने १९व्या षटकात फक्त २ धावा देत आणखी दोन बळी मिळवले. त्यामुळे ६ चेंडूंत १० धावांची गरज असे रोमांचक समीकरण निर्माण झाले.

परंतु, मॅक्सवेलने लुंगी एन्गिडीच्या पहिल्या व पाचव्या चेंडूवर चौकार लगावून संघाचा थरारक विजय साकारला. विशेष म्हणजे दोन चेंडूंवर त्याने एकेरी धाव घेण्यास नकार देत अखेरीस रिव्हर्स स्वीपच्या फटक्याने चौकार वसूल केला. मॅक्सवेल सामनावीर, तर ३ सामन्यांत १५० धावा करणारा डेव्हिड मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता १९ तारखेपासून उभय संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल.

मुंबईसाठी पुढचे तीन तास महत्त्वाचे; संध्याकाळी समुद्राला येणार भरती, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

नांदेडमध्ये पावसाने घरं उध्वस्त; आमदार पोहचले २४ तासांनी, ग्रामस्थांचा संताप

Mumbai Rain Update : ६ तासांत सांताक्रूझमध्ये विक्रमी पर्जन्यमान; १५१ मिमी पावसाची नोंद

मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन थांबली; मध्य आणि हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प, पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सुरू

मुंबईकरांनो सावधान! मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी