क्रीडा प्रतिनिधी/मुंबई
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी होणाऱ्या निर्णायक लढतीत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. या लढतीच्या निमित्ताने जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट व दीपक चहर अशा मुंबईच्या वेगवान त्रिकुटाविरुद्ध जोस बटलर, शुभमन गिल व साई सुदर्शन या गुजरातच्या आघाडीच्या फलंदाजांमधील जुगलबंदी चाहत्यांना पाहता येईल. त्यामुळे कोणते त्रिकुट आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरी करून संघाला विजयी करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ ११ सामन्यांतील ७ विजयांच्या १४ गुणांसह अव्वल चार संघांत स्थान टिकवून आहे. पहिल्या पाचपैकी फक्त १ सामना जिंकणाऱ्या मुंबईने त्यानंतर सलग सहा विजय मिळवले आहेत. त्यामुळे आता बाद फेरी जवळ असताना उरलेल्या ३ पैकी किमान २ लढती जिंकून आगेकूच करण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक आहे. त्यातच गेल्या काही सामन्यांत मुंबईच्या वेगवान त्रिकुटाने वेगळीच लय मिळवली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वानखेडेवर धावा करताना गुजरातला नक्कीच मेहनत करावी लागणार आहे.
दुसरीकडे कर्णधार गिलच्या गुजरातनेही आतापर्यंत चमकदार खेळ केला आहे. १० सामन्यांतील ७ विजयांच्या १४ गुणांसह गुजरातचा संघ तूर्तास चौथ्या स्थानी आहे. गिल, बटलर व सुदर्शन हे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या सहा फलंदाजांमध्ये आहेत. त्यामुळे या फलंदाजांच्या त्रिकुटाला रोखण्याचे आव्हान मुंबईपुढे असेल. त्याशिवाय गुजरातने उभय संघांत झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीत अहमदाबाद येथे मुंबईला नमवले होते. आता मुंबईला त्यांच्याच घरातही धूळ चारून गुजरात बाद फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
दरम्यान, वानखेडेवर झालेल्या यंदाच्या हंगामातील ५ पैकी ३ सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. तसेच मंगळवारची लढत ही मुंबई-बंगळुरू, मुंबई-चेन्नई यांच्यात झालेल्या खेळपट्टीवर होईल. त्यामुळे चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित असून दव मोलाची भूमिका बजावू शकतो. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ शक्यतो प्रथम गोलंदाजीस प्राधान्य देईल. मात्र मुंबई-गुजरातमध्ये २०२२पासून झालेल्या सहाही लढतींमध्ये दर वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे एकंदरच नाणेफेक महत्त्वाची ठरू शकते.
‘त्यामुळे रोहितचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर’
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अजाणतेपणी रोहित दुखापतीसह स्पर्धेत खेळत असल्याचे सांगितले. रोहितला यंदा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवण्याचा निर्णय हंगामापूर्वीच ठरला होता की रोहितने यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला, असे विचारले असता जयवर्धने यांनी सांगितले की, “रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीपासूनच स्नायूंशी निगडित समस्या जाणवत आहे. त्यामुळे रोहितच्या शरारीरावर अतिरिक्त भार येऊ नये, या हेतूने त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवत आहोत.”
सांघिक कामगिरी मुंबईची ताकद
विजयरथावर स्वार असलेल्या मुंबईने गेल्या लढतीत राजस्थानचा १०० धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने सांघिक कामगिरी उंचावत सातत्याने एकामागून एक विजय मिळवले आहेत. फलंदाजीत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेला सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा व डावखुरा रायन रिकल्टन छाप पाडत आहेत. मधल्या फळीत हार्दिक व तिलक वर्माही उत्तम लयीत आहे. फक्त विल जॅक्सकडून मुंबईला धडाकेबाज खेळी अपेक्षित आहे. नमन धीर व कॉर्बिन बोशही फटकेबाजी करू शकतात. तसेच मिचेल सँटनरही सोमवारी सराव करताना दिसला. त्यामुळे तो संघात परतणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मुंबईसाठी या हंगामात आतापर्यंत बोल्टने सर्वाधिक १६ बळी घेतले आहेत, तर फलंदाजीत सूर्यकुमारने सर्वाधिक ४७५ धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या दृष्टीने या दोघांची कामगिरी पुन्हा निर्णायक ठरणार आहे.
प्रसिधवर गुजरातच्या आशा; रबाडाही परतला
स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १९ बळींसह पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यंदा गुजरातसाठी हुकमी एक्का ठरत आहे. फिरकीपटू रशिद खान व मोहम्मद सिराजही लय मिळवत आहेत. त्यामुळे वानखेडेच्या फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर मुंबईविरुद्ध गुजरातच्या गोलंदाजांचाही कस लागेल. त्यातच दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा एका महिन्याच्या निलंबनानंतर पुन्हा भारतात परतला आहे. त्याला थेट मंगळवारी गुजरातचा संघ मैदानात उतरवू शकतो. फलंदाजीत सुदर्शन, गिल व बटलर या त्रिकुटावरच सर्वाधिक षटके खेळण्याची जबाबदारी आहे. मात्र या तिघांपैकी दोघे लवकर बाद झाल्यास वॉशिंग्टन सुंदर, शाहरूख खान व राहुल तेवतिया यांच्यावर दडपण येऊ शकते. विंडीजचा डावखुरा शर्फेन रुदरफोर्ड मात्र मधल्या फळीत मिळेल तेव्हा छाप पाडत आहे.
वंशच्या जागी उर्विल चेन्नईच्या संघात
यष्टिरक्षक फलंदाज वंश बेदी दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्यामुळे त्याच्या जागी गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या उर्विल पटेलची चेन्नई संघाने निवड केली आहे. २६ वर्षीय उर्विलने काही महिन्यांपूर्वी मुश्ताक अली स्पर्धेत त्रिपुराविरुद्ध २८ चेंडूंत शतक झळकावले होते. लिलावात कोणीही खरेदी न केल्यावर चेन्नईने आयुष म्हात्रेसह उर्विलला सराव शिबिरासाठी बोलावले होते. आता बेदी दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने ३० लाख किमतीत उर्विल चेन्नईचा भाग झाला. चेन्नईचा संघ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर गेला असला, तरी पुढील हंगामाच्या दृष्टीने युवा खेळाडूंसह ते संघबांधणी करत आहेत. त्यामुळे उर्विलला किमान पदार्पणाची संधी मिळू शकते.
विदर्भाचा हर्ष हैदराबादच्या ताफ्यात
यंदाच्या रणजी स्पर्धेत सर्वाधिक ६९ बळी मिळवून विदर्भाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी सनरायजर्स हैदराबाद संघात दाखल झाला आहे. २२ वर्षीय फलंदाज रविचंद्रन स्मरण दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने त्याच्या जागी हर्षला संधी देण्यात आली. स्मरण हासुद्धा झाम्पाच्या जागी बदली खेळाडू म्हणून आला होता. मात्र त्याला एकही लढत खेळता आली नाही. परिणामी सरावादरम्यानच दुखापत झाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला आहे. आता हर्षला उरलेल्या काही सामन्यांत हैदराबादचा संघ संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
रिंकूला दुखापत; कोलकाताला चिंता
रविवारी राजस्थानविरुद्धच्या लढतीत कोलकातासाठी क्षेत्ररक्षणात छाप पाडणारा रिंकू सिंग जायबंदी झाला आहे. मात्र अखेरच्या षटकात रिंकूच्या उजव्या पायाजवळ दुखापत झाल्याचे समजते. तो चालतानासुद्धा काहीसा अडखळताना दिसला. त्यामुळे कोलकाताची चिंता वाढली आहे. कोलकाताचा संघ ११ सामन्यांतील ११ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे बाद फेरीच्या शर्यतीत कोलकाता अजूनही टिकून आहे. कोलकाताची आता बुधवारी चेन्नईशी गाठ पडणार आहे. त्यांची ही घरच्या मैदानात म्हणजेच ईडन गार्डन्सवरील यंदाच्या हंगामातील अखेरची लढत असेल.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यांपैकी गुजरातने ४, तर मुंबईने २ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार गुजरातचे पारडे नक्कीच जड आहे. मात्र वानखेडेवर मुंबईला यंदाच्या हंगामात पहिल्या टप्प्यात गुजरातकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा घेण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होऊ शकते.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश, रघु शर्मा.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर, दसुन शनका.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप