GT अग्रस्थानासाठी उत्सुक; आज अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यात CSK ला मात्र विजय अनिवार्य संग्रहित छायाचित्र
क्रीडा

GT अग्रस्थानासाठी उत्सुक; आज अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यात CSK ला मात्र विजय अनिवार्य

२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात व सनरायजर्स हैदराबाद या संघांनी बाद फेरी गाठलेली असून उर्वरित एका स्थानासाठी पाच संघांत चुरस आहे.

Krantee V. Kale

अहमदाबाद : शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीतील स्थान पक्के केले आहे. मात्र सध्या दुसऱ्या स्थानी असलेल्या गुजरातला गुरुवारी होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीत चेन्नई सुपर किंग्जला मोठ्या फरकाने नमवून अग्रस्थान पटकावण्याची संधी आहे. त्याच वेळी चेन्नईला मात्र शर्यतीत टिकून राहण्यासाठी ही लढत जिंकणे गरजेचे आहे. एकूणच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे लक्ष लागून आहे.

२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात व सनरायजर्स हैदराबाद या संघांनी बाद फेरी गाठलेली असून उर्वरित एका स्थानासाठी पाच संघांत चुरस आहे. आयपीएलच्या नियमांनुसार साखळी फेरीच्या अखेरीस आघाडीच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये ‘क्वालिफायर-१’चा मुकाबला रंगतो. या संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळते. ‘क्वालिफायर-१’ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो, तर पराभूत झालेला संघ ‘क्लालिफायर-२’मध्ये खेळतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांत ‘एलिमिनेटर’ लढत होते. यांच्यातील विजेता ‘क्वालिफायर-२’ साठी पात्र ठरतो. तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जातो. म्हणजे एकूणच अव्वल दोन संघांत स्थान मिळवणाऱ्या संघांला अंतिम फेरी गाठण्यासह ट्रॉफी जिंकण्याची उत्तम संधी असते. तर त्याउलट एलिमिनेटर खेळणाऱ्या संघांना चषक पटकावण्यासाठी सलग तीन सामने जिंकावे लागतात.

तूर्तास, गुणतालिकेत बंगळुरू १८ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे, तर गुजरात व हैदराबाद १६ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नेटरनरेट म्हणजेच धावगतीच्या तुलनेत बंगळुरू सर्वांपुढे आहे. त्यामुळेच गुजरातने चेन्नईला ७५ धावांपेक्षा अधिक फरकाने नमवले, तर ते बंगळुरूच्या पुढे जाऊ शकतात.

गिल, साई सुदर्शन व जोस बटलर या आघाडीच्या त्रिकुटावर गुजरातची फलंदाजी अवलंबून आहे. मात्र गेल्या लढतीत त्यांना कोलकाताविरुद्ध २४७ धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले. अहमदाबाद येथे मात्र गुजरातचा संघ अधिक बलवान वाटतो. त्यांनी यंदाच्या हंगामात सहापैकी चार लढती अहमदाबादला जिंकल्या आहेत. कगिसो रबाडा व मोहम्मद सिराज यांची वेगवान जोडी गुजरातची ताकद असून फिरकीपटू रशिद खानसारखा हुकमी एक्का त्यांच्याकडे आहे. तसेच जेसन होल्डर व वॉशिंग्टन सुंदर यांच्या अष्टपैलू योगदानामुळे हा संघ घातक ठरत चालला आहे.

दुसरीकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने १३ सामन्यांत ६ विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात १२ गुण जमा आहेत. मात्र चेन्नईला सलग दोन लढती गमवाव्या लागल्याने त्यांच्यापुढील समस्या वाढल्या आहेत. आता अखेरच्या लढतीत गुजरातला नमवण्यासह त्यांना अन्य संघांच्या समीकरणावर अवलंबून रहावे लागेल. गुजरातने यंदा चेन्नईला चेपॉकवर धूळ चारली होती. त्यामुळे चेन्नई गुजरातला अहमदाबादला नमवून वचपा घेण्यासह हंगामाचा शेवट गोड करणार का, याकडे लक्ष असेल.

महेंद्रसिंह धोनी या लढतीत खेळण्याची शक्यता कमीच आहे. मात्र ऋतुराजची कामगिरी चेन्नईसाठी चिंतेचा विषय आहे. तसेच मधल्या फळीत डेवाल्ड ब्रेविस व शिवम दुबे यांना अपेक्षित छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीत नूर अहमद व अकील होसेन या फिरकीपटूंवर चेन्नईची भिस्त आहे. अनेक खेळाडू जायबंदी झाल्याने त्यांचा वेगवान मारा स्वैर आहे. अंशुल कंबोज व मुकेश चौधरीकडून चेन्नईला अपेक्षा आहेत.

खेळपट्टीचा अंदाज

अहमदाबाद येथील खेळपट्ट्यांवर धावांचा पाठलाग करणे कठीण जात असल्याचे यंदा दिसून आले आहे. तसेच वेगवान गोलंदाजांना येथे पुरेसे सहाय्य लाभत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १७० ते १८० धावा केल्या, तरी सामना रंगतदार होऊ शकतो.

उभय संघांत आतापर्यंत ९ सामने

उभय संघांत आतापर्यंत ९ सामने झाले आहेत. त्यांपैकी गुजरातने ५, तर चेन्नईने ४ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांत फारसा फरक नसला, तरी अहमदाबाद येथे गुजरातला मोठ्या फरकाने नमवण्यासाठी चेन्नईला सर्वस्व पणाला लावावे लागेल.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुझैन.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, कार्तिक शर्मा, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स, आकाश मढवाल, स्पेन्सर जॉन्सन, डायन फोर्स्टर, कुलदीप यादव.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

बाप्पाला निरोप देण्यासाठी ठाणे शहरासह संपूर्ण जिल्हा सज्ज; ठाणे, कल्याण-बदलापूर, भिवंडी परिसरात ४,५०० पोलिसांचा फौजफाटा

२ हजारांवरील UPI पेमेंटवर MDR; ग्राहकांच्या खिशावर काय होणार परिणाम?

११ वर्षांत दुष्काळाचा सातवा फेरा; यंदा दुष्काळाची परिस्थिती अतिभीषण

NSE जगातील सातवे एक्स्चेंज; शेअर बाजार बीएसईवर सूचिबद्ध पदार्पणात मूल्य वाढ

Thane : पितृपक्षात तर्पण विधी महागले; सामान्यांच्या आवाक्याबाहेर दक्षिणा, कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी