क्रीडा

रशिदमुळे गुजरातची बाजी; राजस्थानचा पहिला पराभव

Swapnil S

जयपूर : करामती रशिद खानने ११ चेंडूंत फटकावलेल्या नाबाद २४ धावांच्या बळावर गुजरात टायटन्सने बुधवारी रात्री आयपीएलमध्ये रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्सचा ३ गडी राखून अखेरच्या चेंडूवर पराभव केला. गुजरातचा हा सहा सामन्यांतील तिसरा विजय ठरला, तर राजस्थानला पाच लढतींमध्ये पहिला पराभव पत्करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार संजू सॅमसन (३८ चेंडूंत नाबाद ६८) आणि रियान पराग (४८ चेंडूंत ७६) यांच्या अर्धशतकांमुळे राजस्थानने २० षटकांत ३ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वाल (२४) व जोस बटलर (८) स्वस्तात बाद झाल्यावर सॅमसन व पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी रचली. या दोघांनीही यंदाच्या आयपीएलमधील तिसरे अर्धशतक साकारले. त्यानंतर शिम्रॉन हेटमायरने ५ चेंडूंत १३ धावा फटकावून राजस्थानला दोनशे धावांच्या जवळपास नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिलने (४४ चेंडूंत ७२) गुजरातसाठी दमदार खेळी साकारली. त्याने ६ चौकार व २ षटकारांसह दुसरे अर्धशतक झळकावले. मात्र अन्य फलंदाजांची साथ न लाभल्याने गुजरात एकवेळ १७.३ षटकांत ६ बाद १५७ अशा स्थितीत होता. तेथून रशिद व राहुल तेवतिया यांची जोडी जमली. त्यांनी अखेरच्या १५ चेंडूंत आवश्यक ४० धावा केल्या. २०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तेवतिया ११ चेंडूंत २२ धावांवर बाद झाला. मात्र रशिदने अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना चौकार लगावून गुजरातचा विजय साकारला. त्याने एक बळीसुद्धा मिळवल्याने तोच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस