वर्षभरात ५-६ कसोटींची गरज: हरमनप्रीत कौर (Photo-X)
क्रीडा

वर्षभरात ५-६ कसोटींची गरज: हरमनप्रीत कौर

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा २७० धावांनी पराभव केल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने भविष्यात आणखी जास्त कसोटी सामने खेळण्याची आशा व्यक्त केली आहे.

Swapnil S

लंडन : क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा २७० धावांनी पराभव केल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने भविष्यात आणखी जास्त कसोटी सामने खेळण्याची आशा व्यक्त केली आहे. तसेच ‌‌वर्षभरात किमान ५ ते ६ कसोटी खेळण्याची संधी मिळावी, असेही तिने सांगितले.

हरमनप्रीतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर प्रथमच महिलांचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. या लढतीत भारताने यजमान इंग्लंडचा २७० धावांनी धुव्वा उडवला. मुख्य म्हणजे भारताने इंग्लंडमध्ये आजवर एकही कसोटी गमावलेली नाही, हे विशेष. इंग्लंडमधील १० कसोटी सामन्यांत भारताने ३ विजय मिळवले, तर ७ लढती अनिर्णित राखल्या आहेत. तसेच हरमनच्या नेतृत्वात भारताने पाचपैकी चौथी कसोटी जिंकली.

सामन्यानंतर आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हरमनप्रीत म्हणाली की, “देवाने हा इतिहास खूप सुंदर लिहिला आहे. लॉर्ड्सवर खेळणे नेहमीच विशेष असते आणि हा सामना येथे आयोजित करण्याचा विचार करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. आम्हाला लॉर्ड्सवर आणखी सामने खेळायला मिळतील आणि भविष्यात आणखी किमान १० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळेल अशी आशा आहे.”

शतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत आणणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिचे कौतुक करताना तिने संघभावना हीच आमची खरी ताकद असल्याचे नमूद केले. भाटियाच्या फलंदाजीवर आणि सलामीवीरांच्या कामगिरीवर तिने आनंद व्यक्त केला. संपूर्ण संघाने एकत्रित येत क्षेत्ररक्षणातही चोख भूमिका बजावल्याचे तिने सांगितले.

टी-२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतीय संघाने या कसोटीत पुनरागमन केले आहे. मागील काही मालिका आमच्या बाजूने लागल्या नसतानाही मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि इतर सपोर्ट स्टाफने खेळाडूंचा आत्मविश्वास कायम राखल्याबद्दल हरमनप्रीतने त्यांचे आभार मानले. सपोर्ट स्टाफला लाल चेंडूच्या क्रिकेटचा मोठा अनुभव असून त्यांच्या प्रत्येक क्षणाच्या फीडबॅकचा फायदा झाल्याचे तिने स्पष्ट केले. एकूणच या यशानंतर भारतीय महिला संघावर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

संयम आणि आक्रमकतेचा योग्य मेळ

भरपूर संयम आणि योग्य प्रमाणातील आक्रमकता हाच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंडवरील ऐतिहासिक कसोटी विजयाचा मुख्य आधार ठरला. मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी शतकी खेळी करणाऱ्या यास्तिका भाटिया हिच्या विशेष खेळीचे आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिचे कौतुक केले आहे.

“आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये अत्यंत शिस्तबद्ध दृष्टिकोन ठेवला आणि क्रिकेटच्या मूलभूत गोष्टींना धरून राहिलो. गोलंदाजी करताना अचूक लाईन आणि लेन्थ राखली तसेच आक्रमकतेसोबत संयमाचा मेळ घातला, हाच या विजयाचा मुख्य घटक ठरला,” असे मुझुमदार म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह