नवी मुंबई : कोणत्याही क्षेत्रात क्रांती घडवायची असेल, तर तुम्ही सर्वोच्च यश मिळवणे गरजेचे असते. आम्ही मिळवलेल्या या विश्वविजेतेपदाद्वारे देशातील महिला क्रिकेटचे रूप नक्कीच बदलेल. विश्वविजय हा शेवट नसून एका नव्या युगाची सुरुवात आहे, असे मत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले.
हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ४७ वर्षांचा इतिहास संपुष्टात आणून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. भारत हा महिला विश्वचषक जिंकणारा चौथा देश ठरला. यापूर्वीच्या १२ विश्वचषकांपैकी ऑस्ट्रेलियाने ७, इंग्लंडने ४, न्यूझीलंडने एकदा जेतेपद मिळवले होते. भारताला २००५ व २०१७च्या विश्वचषकात अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी हरमनप्रीतच्या रणरागिणींनी इतिहास रचून स्वप्नपूर्ती केली.
“लहानपणापासूनच मला माझ्या वडिलांनी किंबहुना संपूर्ण कुटुंबाने पाठिंबा दिला. त्यामुळेच मी आज इथवर मजल मारू शकली. संघ म्हणून आम्ही गेल्या काही वर्षांत सातत्याने चांगली कामगिरी करत होतो. मात्र मोठे विजेतेपद आम्हाला सातत्याने हुलकावणी देत होते. आता अखेरीस ते साध्य झाले आहे. त्यामुळे हे जेतेपद भारतातील प्रत्येकी मुलीला प्रेरणादायी ठरेल,” असे ३६ वर्षीय हरमनप्रीत बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
“दुखापतीमुळे प्रतिकाला गमावणे दुर्दैवी होते. मात्र शफाली संघात दाखल झाल्यावर ती फक्त बदली खेळाडू म्हणून आली आहे, असे आम्ही तिला जाणवू दिले नाही. संपूर्ण संघातील खेळाडू कुटुंबाप्रमाणे स्पर्धेत खेळत आले. प्रशिक्षकांपासून सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकाचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. जेव्हा निकाल आमच्या बाजूने लागला नाही, तेव्हाही आम्ही सकारात्मक राहिलो. नवी मुंबईत शेवटच्या दोन साखळी सामन्यांसाठी दाखल झालो, तेव्हापासून आमचे नशीबही पालटले. या सर्व गोष्टींचे फलित म्हणजेच विश्वविजेतेपद आहे,” असेही हरमनप्रीतने सांगितले.
“जेव्हा लहानपणी टीव्हीवर भारताचे सामने बघायची, तेव्हा आपणही एक दिवस क्रिकेट खेळून आपल्याला सर्वांनी टीव्हीवर पहावे, असे वाटायचे. आमच्या या जेतेपदाद्वारे आता देशभरातील असंख्य मुलींना माझ्याप्रमाणेच प्रेरणा मिळेल. स्वप्न पाहणे गरजेची असतात. कारण त्याशिवाय ती पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द आपल्यात येत नाही,” असे हरमनप्रीतने नमूद करून जेतेपद भारतीय महिलांना समर्पित केले.
मिताली, झुलनही विश्वचषकाचे हकदार!
विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाने संपूर्ण मैदानात फेरी मारून चाहत्यांचे अभिवादन केले. यावेळी मिताली राज आणि झुलन गोस्वामी या माजी महिला क्रिकेटपटू मैदानातच स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी त्यांचे कार्य करत होते. मात्र भारतीय संघातील खेळाडूंनी विशेषत: हरमन व स्मृतीने मिताली व झुलन यांच्याकडे चषक सोपावला. दोघांनाही आलिंगन दिले व वेगळाच जल्लोष केला. तसेच सर्व संघाने खेळपट्टीभोवतीही गोळा होऊन नवे गाणे गायले. मिताली व झुलन यांनी महिला क्रिकेटसाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे तेसुद्धा आमच्यासह विश्वचषक जिंकले आहेत, असे हरमनप्रीत म्हणाली.
पंतप्रधानांशी आज दिल्लीत भेट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दिल्ली येथील निवासस्थानी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेणार आहेत. यासाठी भारताचे खेळाडू मंगळवारीच दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचे मंगळवारी विलेपार्ले येथील राहत्या घरी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
विजयी मिरवणूक तूर्तास नाही!
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. त्यावेळी मुंबईतील मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. जवळपास लाखोच्या घरात यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे यावेळी महिला संघाचीही मिरवणूक काढण्यात येईल, असे चाहत्यांना वाटले. मात्र बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी तूर्तास विजयी मिरवणूक नसल्याचे सांगितले.
आयसीसीची पुढील काही दिवसांत दुबई येथे बैठक आहे. त्यामुळे बीसीसीआयचे पदाधिकारी तेथे असतील. यामध्ये आशिया चषकाच्या ट्रॉफीवरून झालेल्या गदारोळाविषयी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर भारतात परतल्यावर महिला संघासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. तसेच जून महिन्यात बंगळुरू येथे आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीत अनेक नागरिकांचा बळी गेल्याने भविष्यात कोणत्याही संघाच्या मिरवणुकीबाबत संभ्रम कायम असेल.
दरम्यान, सप्टेंबरमध्ये भारताने आशिया चषक स्पर्धा जिंकली, मात्र पाकिस्तानच्या मोहसीन नक्वी यांनी अद्याप भारताला चषक सुपूर्द केलेला नाही. त्यामुळे आयसीसी बैठकीत यावर काय तोडगा काढला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.