नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत खेळायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाला अखेरची संधी दिली आहे. सामने श्रीलंकेत हलवण्याची बांगलादेशची मागणी फेटाळून लावत, भारतात येऊन खेळायचे की नाही याबाबत २४ तासांत निर्णय कळवण्याचा अल्टिमेटम आयसीसीने बुधवारी (दि.२१) दिला. आयसीसीच्या बैठकीत झालेल्या मतदानात १६ सदस्यांपैकी १४ सदस्यांनी बीसीबीच्या मागणीविरोधात मतदान केले.
सामने नियोजित वेळापत्रकानुसारच, आयसीसीने केले स्पष्ट
बीसीबीने सुरक्षेच्या कारणास्तव चिंता व्यक्त करून भारतातील आपले सामने स्थलांतरित करण्याची मागणी केल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी भारतातील कोणत्याही स्पर्धास्थळी बांगलादेशी खेळाडू, अधिकारी किंवा चाहत्यांच्या सुरक्षिततेला ठोस धोका नसल्याचे सांगत, सामने नियोजित वेळापत्रकानुसारच भारतात होतील, असे आयसीसीने स्पष्ट केले.
दीड तास बैठक, बीसीबीच्या बाजूने फक्त दोन मतं
दीड तास चाललेल्या बैठकीत बांगलादेशचा प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आला. पीटीआयशी बोलताना आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले की, १६ सदस्यांपैकी १४ सदस्यांनी बीसीबीच्या मागणीविरोधात मतदान केले. फक्त बांगलादेश आणि पाकिस्तान यांनी या मागणीच्या बाजूने मत दिले. बांगलादेशला २१ जानेवारीपर्यंत सहभागाबाबत कळवण्यास सांगितले होते. मात्र, आयसीसीने त्यांना आणखी एक दिवस दिला आहे,” असे सूत्रांनी सांगितले.
बांगलादेश सरकारने खेळाडूंची तातडीची बैठक बोलावली
या घडामोडींनंतर बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरूल यांनी आज (२२ जानेवारी) ढाक्यातील हॉटेल इंटरकॉन्टिनेंटल येथे राष्ट्रीय संघातील खेळाडूंची बैठक बोलावली आहे. ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, दुपारी ३ वाजता होणाऱ्या या बैठकीत खेळाडूंची मत जाणून घेतली जाणार आहेत. बांगलादेशचा टी२० कर्णधार लिटन कुमार दासने, भारतात खेळण्याबाबत खेळाडूंची संमती घेतली नसल्याचे यापूर्वीच सांगितले होते.
एखादा चमत्कार घडेल, अशी आशा
दरम्यान, आयसीसीच्या बैठकीनंतर बोलताना, “आयसीसीकडून एखादा चमत्कार घडेल, अशी आशा आहे. कोणाला विश्वचषक खेळायचा नसतो?” असे बीसीबी अध्यक्ष अमिनुल इस्लाम म्हणाले. “मतदानापूर्वी आम्ही आयसीसीला आमच्या निर्णयामागील कारणे समजावून सांगितली. आम्हाला मतदानात जायचे नव्हते. आमच्या खेळाडूंना विश्वचषक खेळायचा आहे, सरकारलाही तशीच इच्छा आहे. मात्र, आम्हाला भारतात आमच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत चिंता आहे,” असे अमिनुल म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, सामने श्रीलंकेत हलवणे किंवा आयर्लंड अथवा झिम्बाब्वेसोबत गटांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव दिला होता. “तो सर्वात सोपा पर्याय होता. पण श्रीलंकेने त्यांच्या गटात नवा संघ नको असल्याचे सांगितले.” अमिनुल इस्लाम यांनी सांगितले की, “सरकारशी अंतिम वेळेस चर्चा करण्यासाठी मी आयसीसी बोर्डकडे वेळ मागितला आहे,” आणि या विषयावर ते पुन्हा एकदा बांगलादेश सरकारशी बोलणार आहेत.
...तर स्कॉटलंड तयार
भारतात न खेळण्याच्या निर्णयावर बांगलादेश ठाम राहिल्यास त्यांची जागा दुसऱ्या संघाला दिली जाऊ शकते. स्कॉटलंडला ग्रुप ‘सी’मध्ये बांगलादेशच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. आयसीसी क्रमवारीनुसार स्कॉटलंड हा पुढील पात्र संघ आहे.