चेन्नई : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारचा दिवस दुहेरी अर्थाने निर्णायक ठरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणारा यजमान भारतीय संघ सुपर-आठ फेरीसह विश्वचषकातील आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने गुरुवारी झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरेल. चेन्नईतील एमए चिदम्बरम स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत आता भारतीय खेळाडूंना एकही चूक करून चालणार नाही. त्याशिवाय गुरुवारीच दुपारी होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीकडेही भारतीय संघासह तमाम देशवासियांचे लक्ष असेल.
भारतीय संघाला विश्वचषकाच्या सुपर-आठ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. १८८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १८.५ षटकांत १११ धावांतच गारद झाला. भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक साकारता आले नाही. तसेच भारताची धावगती (नेट रनरेट) फारच खालावल्याने उर्वरित दोन लढती मोठ्या फरकाने जिंकणे त्यांच्यासाठी अनिवार्य असेल. भारताची गुरुवारी झिम्बाब्वेशी गाठ पडेल, तर १ मार्च रोजी त्यांच्यासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान असेल.
मुख्य म्हणजे भारतीय संघाचे पहिले तिन्ही फलंदाज डावखुरे असून त्यांपैकी दोघांचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यातही अभिषेक शर्माला तीन डावांत भोपळाही फोडता आलेला नाही. तर आफ्रिकेविरुद्ध त्याने जेमतेम १५ धावा केल्या. तसेच तिसऱ्या क्रमांकावरील तिलक आफ्रिकेविरुद्ध एकाच धावेवर बाद झाला. त्यापूर्वीच्या सामन्यातही त्याने २५ ते ३० धावाच केल्या असल्या, तरी फिरकीविरुद्ध तिलक संघर्ष करताना दिसत आहे. त्याचा स्ट्राइक रेटही खालावलेला आहे. अशा स्थितीत पर्यायी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. इशान किशनचे संघातील स्थान कायम राहील, असे समजते.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले होते. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असले, तरी सुपर-आठ फेरीतच गाशा गुंडाळण्याचे सावटही त्यांच्यावर निर्माण झाले आहे.
भारताने अ-गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना सलग चार विजय नोंदवले. भारताने सर्वप्रथम वानखेडेवर अमेरिकेला पराभूत केले. मग नवी दिल्ली येथे नामिबियाला धूळ चारली. कोलंबो येथे पाकिस्तानला चीतपट करून भारताने सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील स्थान पक्के केले. मग चौथ्या साखळी लढतीत नेदरलँड्सवर मात करून भारताने विजयी चौकार लगावला.
दुसरीकडे झिम्बाब्वेला सुपर-आठ फेरीच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून १०७ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची अवस्था भारतापेक्षाही बिकट असून उर्वरित दोन्ही लढती मोठ्या फरकाने जिंकणे झिम्बाब्वेला अनिवार्य आहे. २०२२मध्ये भारत-झिम्बाब्वे यांच्यात टी-२० विश्वचषकातील आजवरचा एकमेव सामना झाला होता. त्याप्रमाणेच यंदाही विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ आतुर असेल. या लढतीवर पावसाचे सावट नसून खेळपट्टी फिरकीपटूंना पोषक ठरू शकते. दवही निर्णायक भूमिका बजावेल.
बुमरावर पुन्हा भिस्त; रिंकूविषयी संभ्रम, अक्षर पटेल
गोलंदाजीत भारताची प्रामुख्याने तारांकित जसप्रीत बुमरावर भिस्त असेल. तसेच आफ्रिकाविरुद्ध अपयशी ठरलेला वरुण चक्रवर्ती लय मिळवण्यास आतुर असेल. रिंकू सिंग कौटुंबिक कारणास्तव या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अक्षर पटेलचे संघातील पुनरागमन पक्के मानले जात आहे. अक्षरला वगळण्यावरून संघ व्यवस्थापनावर टीकाही करण्यात आली होती.
अर्शदीप सिंगही बुमराला योग्य साथ देत आहे. मात्र हार्दिक पंड्या व शिवम दुबे यांना गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. वॉशिंग्टन सुंदरलाही अपेक्षित योगदान देता आलेले नाही. फलंदाजीतही या तिघांकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. मोहम्मद सिराज व कुलदीप यादव यांना खेळवण्याच्या प्रस्तावही भारतापुढे उपलब्ध आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज.
झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे, टिनोतेंदा मापोसा, मारुमनी, वेलिंग्टन मसाकाझा, टॉनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझराबानी, डायन मेयर्स, रिचर्ड एनगरावा, रायन बर्ल, ग्रीमी क्रीमर.