मुंबई : अनुभवी वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने (२७ धावांत ४ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्याला कर्णधार शाय होपच्या (४४ चेंडूंत नाबाद ६१ धावा) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे वेस्ट इंडिजने टी-२० विश्वचषकात रविवारी सकाळी झालेल्या लढतीत नेपाळचा ९ गडी व २८ चेंडू राखून धुव्वा उडवला.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या क-गटातील या लढतीत नेपाळने दिलेले १३४ धावांचे लक्ष्य विंडीजने अवघ्या १५.२ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात गाठले. सलग तिसऱ्या विजयासह विंडीजने क-गटातून सर्वप्रथम सुपर-आठ फेरी गाठण्याचा मान मिळवला. तर सलग तिसऱ्या पराभवामुळे नेपाळचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. होल्डरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आता विंडीजची अखेरची लढत इटलीशी होईल.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.
उभय संघांतील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना नेपाळकडून फक्त दिपेंद्र सिंगने ४७ चेंडूंत ५८ धावांची झुंज दिली. फिरकीपटू अकील होसेन व मॅथ्यू फोर्डे यांनी पॉवरप्लेमध्येच त्यांची ६ षटकांत ४ बाद २३ अशी स्थिती केली होती. मग होल्डरने मधली फळी गुंडाळली. लक्ष्याचा पाठलाग करताना मग ब्रँडन किंग व होप यांनी ४३ धावांची सलामी नोंदवली. किंग २२ धावांवर बाद झाल्यावर होप व हेटमायर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचून १६व्या षटकात संघाचा विजय साकारला. होपने ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६१, तर हेटमायरने ४ चौकार व २ षटकारांसह ३२ चेंडूंत नाबाद ४६ धावा फटकावल्या.
२०१२ व २०१६मध्ये टी-२० विश्वचषक उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या साखळी सामन्यात स्कॉटलंडला धूळ चारली, तर नंतरला वानखेडेवर इंग्लंडला नेस्तनाबूत केले. आता नेपाळला नमवून विंडीजने आगेकूच केली आहे. त्यामुळे सुपर-आठ फेरीत त्यांना कमी लेखणे अन्य संघांसाठी धोकादायी ठरू शकते.
संक्षिप्त धावफलक
नेपाळ : २० षटकांत ८ बाद १३३ (दिपेंद्र सिंग ५८, सोमपाल कमी नाबाद २६; जेसन होल्डर ४/२७) पराभूत वि. g वेस्ट इंडिज : १५.२ षटकांत १ बाद १३४ (शाय होप नाबाद ६१. शिम्रॉन हेटमायर नाबाद ४६; नंदन यादव १/२४)
सामनावीर : जेसन होल्डर