एक्स (@BCCIWomen)
क्रीडा

Women's T20 WC: स्मृतीकडून अपेक्षा, हरमनप्रीतबाबत अद्याप संभ्रम; भारताची आज लंकेशी लढत, फलंदाजांच्या कामगिरीची चिंता

Swapnil S

दुबई : पहिल्यावहिल्या आयसीसी जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय महिला संघाला सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती जिंकणे अनिवार्य आहे. त्यातही श्रीलंकेविरुद्ध बुधवारी दुबई येथे होणाऱ्या तिसऱ्या साखळी सामन्यात भारताला मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. त्यामुळे भारताचे फलंदाज कामगिरी उंचावून आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला धूळ चारण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा यंदाच्या विश्वचषकासाठी अ-गटात समावेश करण्यात आला आहे. मात्र न्यूझीलंडविरुद्धचा पराभव व पाकिस्तानविरुद्ध संघर्षानंतर मिळवलेला विजय यामुळे भारत सध्या गटात २ सामन्यांतील २ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. भारताची धावगती (-१.२१७) आघाडीच्या तिन्ही संघांच्या तुलनेत फारच खराब आहे. प्रत्येक गटातून पहिले दोन संघच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे भारताला श्रीलंकेसह १३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियालासुद्धा मोठ्या फरकाने नमवावे लागेल. तूर्तास अ-गटात न्यूझीलंड अग्रस्थानी (२.९०० धावगती), ऑस्ट्रेलिया दुसऱ्या (१.९०८), तर पाकिस्तान (०.५५५) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चार वर्षांपूर्वी २०२०मध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारताने टी-२० विश्वचषकाची प्रथमच अंतिम फेरी गाठली होती, मात्र तेथे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२३च्या टी-२० विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत पराभूत झाला. आतापर्यंतच्या ८ टी-२० विश्वचषकात भारताला एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे यंदा भारताच्या रणरागिणींकडून चाहत्यांना जगज्जेतेपद अपेक्षित आहे. मात्र त्यांच्यापुढील आव्हान सोपे नसेल.

काही महिन्यांपूर्वीच आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेने भारताला नमवले होते. सध्या श्रीलंकेचा संघ दोन पराभवांमुळे अ-गटात तळाच्या पाचव्या स्थानी असला, तरी ते भारताला धक्का देऊ शकतात. त्यामुळे भारताला सर्व आघाड्यांवर कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. या लढतीत पावसाची शक्यता नसून खेळपट्टी काहीशी संथ व फिरकीपटूंसाठी पोषक ठरणारी आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांचा कस लागू शकतो.

त्याशिवाय ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीचा निकालही भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला नमवल्यास भारताचे टेन्शन काहीसे कमी होईल. मात्र ऑस्ट्रेलिया जिंकल्यास न्यूझीलंडचा संघ किमान श्रीलंका किंवा पाकिस्तान यांच्याकडूनही पराभूत व्हावा, यासाठी भारताला प्रार्थना करावी लागेल. त्यामुळे एकूणच उपांत्य फेरीचे समीकरण रंगतदार बनणार आहे.

अरुंधती आणि फिरकी त्रिकुटावर मदार

पाकिस्तानविरुद्ध सामनावीर ठरलेली वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीकडे पुन्हा चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच श्रेयांका पाटील, आशा शोबना व दीप्ती यांचे फिरकी त्रिकुट भारताची ताकद आहे. रेणुका सिंगही प्रभावी गोलंदाजी करत आहे. स्नायूंच्या दुखापतीमुळे पूजा वस्त्रकार मात्र या लढतीसही मुकण्याची शक्यता आहे. तसेच क्षेत्ररक्षणात भारताला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताने ३ सोपे झेल सोडले होते. त्यामुळे भारताला या विभागातही सुधारणा करावी लागेल.

स्मृतीकडून अपेक्षा; हरमनप्रीतबाबत अद्याप संभ्रम

भारताची सलामीवीर स्मृती मानधनाला या स्पर्धेच्या दोन सामन्यांत अनुक्रमे १२ व ७ धावा करता आल्या. त्यामुळे तिच्याकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या १९ टी-२० सामन्यांत स्मृतीने फक्त २ अर्धशतके झळकावली असून तिची सरासरी २२ इतकी आहे. दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत हरमनप्रीतच्या मानेला दुखापत झाल्याने तिच्या समावेशाबाबत संभ्रम कायम आहे. शफाली वर्मा व जेमिमा रॉड्रिग्ज या युवांनी गेल्या लढतीत चांगली फलंदाजी केली. मात्र त्यांना धावगती वाढवावी लागेल. दीप्ती शर्मा व रिचा घोष यांनीही अद्याप निराशा केली आहे. त्यामुळे बहुतांशी हरमनप्रीतवरच भारताची फलंदाजी अवलंबून आहे.

श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’; अटापटूवर भिस्त

श्रीलंकेची भिस्त प्रामुख्याने कर्णधार चामरी अटापटूवर आहे. मात्र या विश्वचषकात तिला अद्याप १० धावाही करता आल्या नाहीत. याचा भारतीय संघ लाभ उचलू शकतो. तसेच हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी यांनी आशिया चषकाप्रमाणेच यावेळीसही चांगली कामगिरी केली आहे. सांघिक कामगिरीत श्रीलंका अपयशी ठरत असल्याने तूर्तास ते स्पर्धेतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे श्रीलंकेलाही उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. आशिया चषक विजेत्या या संघाला गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. तसेच भारताविरुद्ध त्यांची गेल्या काही वर्षांतील कामगिरी चांगली असल्याने ही लढत रंगतदार होऊ शकते.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, आशा शोबना, श्रेयांका पाटील, राधा यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार.

श्रीलंका : चामरी अटापटू (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी, निलक्षिका सिल्व्हा, कविशा दिलहारी, अमा कंचना, इनोशी प्रियदर्शनी, शशिनी गिमहानी, अनिनी कुलसुरिया, सुगंदिका कुमारी, सचिनी निसंसला, उदेशिका प्रबोधिनी, इनोका रणवीरा.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून , थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि हॉटस्टार ॲप

Election Results 2024: हरयाणात भाजपची हॅटट्रिक; जम्मू-काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेस सत्तेवर

अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

मंत्रालयात पुन्हा जाळीवर उड्या; आदिवासी कोट्यातून आरक्षणाच्या मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक

मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी चुली, शेकोट्या बंद; हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी BMC ची कडक मार्गदर्शक तत्त्वे

गुजरातचे दोन ठग महाराष्ट्र लुटताहेत; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदी, शहांवर सडकून टीका