नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला संघाची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली होती. गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील विश्वविजेत्यांची भेट घेतली. यावेळी भारतीय संघाने मुर्मू यांना खास जर्सी भेट म्हणून दिली. यावर सर्व खेळाडूंनी हस्ताक्षर केले होते.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ४७ वर्षांचा इतिहास संपुष्टात आणून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. भारत हा महिला विश्वचषक जिंकणारा चौथा देश ठरला. यापूर्वीच्या १२ विश्वचषकांपैकी ऑस्ट्रेलियाने ७, इंग्लंडने ४, न्यूझीलंडने एकदा जेतेपद मिळवले होते. भारताला २००५ व २०१७च्या विश्वचषकात अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी हरमनप्रीतच्या रणरागिणींनी इतिहास रचून स्वप्नपूर्ती केली.
दरम्यान, यावेळी भारताचे सर्व १६ खेळाडू, प्रशिक्षक अमोल मुझुमदार, सपोर्ट स्टाफमधील सदस्य आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष मिथुन मन्हास उपस्थित होते. मुर्मू यांनी खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. बुधवारी मोदींनी तसेच जेमिमा रॉड्रिग्जची उपांत्य फेरीतील खेळी, तीन सामन्यांतील पराभवामुळे सगळीकडून झालेली टीका व त्यातून केलेले पुनरागमन याविषयी चर्चा केली होती. हरमनप्रीतनेही देशाला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनवण्याच्या दिशेने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी मोदींसह केंद्र शासनाचे आभार मानले. आता २०२६चा टी-२० विश्वचषक व त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतही महिला संघाने जेतेपद मिळवावे, यासाठी मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. हरलीन देओलनेही मोदींना गमतीदार प्रश्न विचारला.
एकूणच भारतीय महिला संघाने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. युवा पिढीला किंबहुना मुलींना याद्वारे क्रिकेट तसेच आपल्या आवडत्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्यामुळेच हे जेतेपद अनेक कारणांनी खास आहे.