राजकोट : शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. राजकोट येथील निरजंन शाह स्टेडियमवर उभय संघांतील दुसरा एकदिवसीय सामना रंगणार असून या सामन्यात भारताला खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत तीन एकदिवसीय व पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकत्रित खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे. दुखापतीतून सावरलेल्या गिलचे या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले असून तोच कर्णधारपद भूषवत आहे. तसेच श्रेयस अय्यरही संघात परतला आहे. गिल मानेच्या तसेच पायाच्या दुखापतीमुळे एक महिना संघाबाहेर होता, तर श्रेयसला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांना मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय प्रकाराचा विश्वचषक थेट २०२७मध्ये असल्याने भारताकडे त्याकरिता संघबांधणी करण्यासाठी तूर्तास पुरेसा वेळ आहे.
दरम्यान, रविवारी बडोदा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताने न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात केली. विराटने शानदार अर्धशतका साकारून मने जिंकली. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत १-० असा आघाडीवर आहे. भारताने न्यूझीलंडचा सलग ९ विजयांचा रथ रोखला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात किवी संघ आणखी जोमाने पलटवार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने या मालिकेत आतापर्यंत ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंना दुखापतीमुळे गमावले आहे. त्यांच्या जागी बदली खेळाडू संघात दाखल झाले असले, तरी आता उर्वरित लढतींमध्ये प्रमुख खेळाडूंना दुखापती होणार नाही, याकडेही लक्ष द्यावे लागेल.
राजकोट येथे आतापर्यंत झालेल्या ४ एकदिवसीय सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघच जिंकला आहे. येथे दव फारसे येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल फारसा निर्णायक नसेल. अशा स्थितीत दोन्ही संघांत कडवी झुंज पाहायला मिळेल.
विराट, श्रेयसवर फलंदाजीत भिस्त
तारांकित विराटने गेल्या चारही सामन्यांत किमान ५०हून अधिक धावा केल्या आहेत. आफ्रिकेविरुद्ध दोन शतके साकारणाऱ्या विराटला रविवारी शतकाने हुलकावणी दिली. मात्र तो पुन्हा फलंदाजीचा भार वाहण्यास सज्ज असेल. त्याशिवाय गिल, मुंबईकर श्रेयस अय्यरही लयीत आहेत. रोहित उत्तम सुरुवात करत असला तरी त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. अनुभवी यष्टिरक्षक के. एल. राहुलने आपली उपयुक्तता पुन्हा सिद्ध केली आहे. अशा स्थितीत रवींद्र जडेजावर कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. सुंदरच्या जागी फलंदाजीत कुणाला संधी मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल.
सुंदरच्या जागी अर्शदीप की नितीश?
फिरकी अष्टपैलू सुंदर दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघ थेट आयुष बदोनीला संधी देणार की अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवणार, याकडे लक्ष असेल. भारताकडे नितीश रेड्डीचा पर्याय उपलब्ध आहे. तो सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करून मध्यमगती गोलंदाजी करू शकतो. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगलाही संधी दिली जाऊ शकते. कुलदीप यादव व जडेजा फिरकीची बाजू सांभाळतील. हर्षित राणा, मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान माऱ्याची मदार आहे. पॉवरप्लेमध्ये भारताने विकेट पटकावणे अपेक्षित आहे.
मिचेल, जेमिसन न्यूझीलंडची ताकद
भारताविरुद्ध हमखास धावा करणारा डॅरेल मिचेल व वेगवान गोलंदाज कायले जेमिसन यांच्यावर पुन्हा एकदा किवी संघाची भिस्त असेल. विशेषत: मिचेलने पहिल्या लढतीत अर्धशतक साकारले, तर जेमिसनने ४ बळी घेतले. कर्णधार मिचेल ब्रेसवेल व आदित्य अशोक यांच्याकडूनही फिरकी विभागात चमक अपेक्षित आहे. फलंदाजीत डेवॉन कॉन्वे व हेन्री निकोल्स यांनी अर्धशतके झळकावून छाप पाडली. मधल्या फळीत किवी संघाला सुधारेणीची गरज आहे. अनुभवाच्या तुलनेत हा संघ भारतापेक्षा कमी असला, तरी त्यांना कमी लेखणे महागात पडू शकते.
उभय संघांत आतापर्यंत १२१ एकदिवसीय सामने झाले असून भारताने त्यापैकी ६३, तर न्यूझीलंडने ५० लढती जिंकल्या आहेत. ७ सामने रद्द झाले आहेत, तर एक लढत टाय झाली होती.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, आयुष बदोनी.
न्यूझीलंड : मिचेल ब्रेसवेल (कर्णधार), आदित्य अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेवॉन कॉन्वे, झॅक फोल्क्स, मिच हे, कायले जेमिसन, निक केली, जेडन लीनॉक्स, डॅरेल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल रे, विल यंग.