भारताने मालिका जिंकली, पण... पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडची बाजी; भारताच्या सलामीवीर, गोलंदाजांकडून निराशा (Photo-X)
क्रीडा

भारताने मालिका जिंकली, पण... पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडची बाजी; भारताच्या सलामीवीर, गोलंदाजांकडून निराशा

IND vs NZ, 5th T20I : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-२ असे यश संपादन केले.

Swapnil S

हॅमिल्टन : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-२ असे यश संपादन केले. मात्र रविवारी झालेल्या पाचव्या लढतीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला.

ॲडम मिल्नेची (१९ धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजी व टिम सेईफर्ट (५० चेंडूंत ९३ धावा), ग्लेन फिलिप्स (३८ चेंडूंत नाबाद ६५) यांच्या अर्धशतकांमुळे न्यूझीलंडने भारताला ७ गडी व १२ चेंडू राखून नेस्तनाबूत केले. पहिले तीन सामने गमावल्यावर न्यूझीलंडने सलग दोन लढतींमध्ये भारताला सहज नमवले. सलामीवीरांसह गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीचा भारताला सलग दुसऱ्या सामन्यात फटका बसला.

एकीकडे भारतात नवरात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर आता दिवाळीचे वेध लागले असतानाच तिकडे भारतीय संघाच्या न्यूझीलंड वारीला २२ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. न्यूझीलंडमधील मागील दोन टी-२० मालिकांमध्ये भारत अपराजित आहे. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वात भारत त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, याकडे लक्ष होते. त्यात भारताला यश आले. या दौऱ्यात ५ टी-२०, ५ एकदिवसीय व २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. आता टी-२० मालिकेनंतर ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.

भारताची खराब सुरुवात

दरम्यान, हॅमिल्टन येथे झालेल्या पाचव्या लढतीसाठी भारताने वरुण चक्रवर्तीला संधी दिली, तर मयांक यादव, वैभव सूर्यवंशी, अक्षर पटेल संघाबाहेर होते. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ८ बाद १९१ धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे सलामीवीर अवघ्या १९ धावांत बाद झाले होते. त्यानंतर श्रेयस आणि इशान किशन यांनी डाव सावरला. सॅमसनच्या सातत्यपूर्ण कामगिरीबाबतही आता प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुढील टी-२० मालिकेपूर्वी त्याला फॉर्म मिळवण्याचे आव्हान असेल.

किशन, श्रेयसने सावरले

किशनने ३२ चेंडूंत ६१ धावा केल्या, तर अय्यरने अवघ्या २३ चेंडूंत ५० धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. किशनने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तर अय्यरने २२ चेंडूंत पन्नाशी गाठली. मात्र, नॅथन स्मिथ आणि ब्लेअर टिकनर यांनी दोघांना बाद करत भारताच्या धावगतीला लगाम घातला. तिलक वर्मा (६) स्वस्तात बाद झाला. नमन धीर (३३) व नितीश रेड्डी (२२) यांनी अखेरीस काहीशी फटकेबाजी केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिल्नेने १९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताला अखेरच्या सात षटकांत केवळ ५७ धावा करता आल्या.

सेईफर्टला जीवदान

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दुसऱ्याच षटकात फिन ॲलनला (२) गमावले. मात्र नमनने सेईफर्टचा झेल सोडला. हीच चूक भारताला महागात पडली. सेईफर्ट आणि डॅरेल मिचेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. मिचेलने १६ चेंडूंत २९ धावा करत भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने प्रिन्स यादवच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकले. मात्र, वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केले.

न्यूझीलंडचे वर्चस्व

मग सेईफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सेईफर्टने ५० चेंडूंत ११ चौकार आणि ५ षटकारांसह ९३ धावा केल्या. त्याने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भुवनेश्वर कुमारच्या एका षटकात त्याने ४, ६, ६, ४ अशी फटकेबाजी केली. त्यातील एक षटकार तब्बल १०८ मीटर लांब गेला. दुसऱ्या बाजूला फिलिप्सने ३८ चेंडूंत नाबाद ६५ धावा केल्या. त्याने अवघ्या २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

नितीशने १६व्या षटकात सेईफर्टला ९३ धावांवर बाद केले. त्याचे शतक थोडक्यात हुकले. मात्र तोपर्यंत न्यूझीलंडचा विजय पक्का झाला होता. अखेर फिलिप्सने नाबाद ६५ धावा फटकावून १८ षटकांतच १९२ धावांचे लक्ष्य गाठून संघाला सलग दुसरा विजय मिळवून दिला. अनुभवी भुवनेश्वर, अर्शदीप यांनी निराशा केली. वरुणनेदेखील ४ षटकांत ४५ धावा लुटल्या. मिल्नेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर मालिकेत एका शतकासह सर्वाधिक ३४१ धावा करणारा फिलिप्स मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

भारताने न्यूझीलंडविरुद्ध तब्बल १७ वर्षांनी सलग दोन टी-२० सामने गमावले. तसेच श्रेयसच्या नेतृत्वात २४ सामन्यांत भारताने १० टी-२० लढती गमावल्या आहेत.

एखाद्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम फिलिप्सने (३४१) केला. त्याने इंग्लंडच्या फिल सॉल्टचा (३३१ धावा वि. विंडीज, २०२३) मोडीत काढला.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ८ बाद १९१ (इशान किशन ३२ चेंडूंत ६१, श्रेयस अय्यर २३ चेंडूंत ५०; मिल्ने ४/१९) पराभूत वि.

न्यूझीलंड : १८ षटकांत ३ बाद १९५ (टिम सेईफर्ट ५० चेंडूंत ९३, ग्लेन फिलिप्स ३८ चेंडूंत नाबाद ६५; नितीश रेड्डी २/१९)

सामनावीर : ॲडम मिल्ने

मालिकावीर : ग्लेन फिलिप्स

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा पुन्हा एल्गार! ज्ञानेश कुमार नसते तर मोदी पंतप्रधान झालेच नसते : राहुल गांधी; रामलीला मैदानावर SIR विरोधी महारॅली

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग

GST संकलनाचा विक्रम; ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन

महादेव बेटिंग अ‍ॅपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरचे भारतात प्रत्यार्पण