IND vs NZ : भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे! सलग तिसरा टी-२० सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज Photo : X (BCCI)
क्रीडा

IND vs NZ : भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे! सलग तिसरा टी-२० सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता भारताने न्यूझीलंडविरुद्धचे पहिले दोन्ही सामने जिंकून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आता रविवारी गुवाहाटी येथे होणारा तिसरा सामना जिंकून टी-२० मालिका विजयाचे लक्ष्य सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बाळगले आहे.

Swapnil S

गुवाहाटी : एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता भारताने न्यूझीलंडविरुद्धचे पहिले दोन्ही सामने जिंकून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आता रविवारी गुवाहाटी येथे होणारा तिसरा सामना जिंकून टी-२० मालिका विजयाचे लक्ष्य सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बाळगले आहे.

टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होण्याआधी फक्त दोन आठवडे आणि न्यूझीलंडविरुद्धचे तीन टी-२० सामने बाकी असून भारताची संघबांधणी जवळपास पूर्ण झाली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत खेळाडूंची निवड पक्की समजली जात असून फक्त काही ठिकाणी खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. त्यापैकीच एक जागा संजू सॅमसनसाठी राखीव समजली जात आहे.

इशान किशनने ३२ चेंडूंत खणखणीत ७६ धावांची खेळी करत संजू सॅमसनला या जागेसाठी खुले आव्हान दिले आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे सलामीवीर म्हणून छाप पाडू शकले नाहीत. सॅमसनला मिळालेल्या संधीचे सोने करता आलेले नाही. शुभमन गिलकडे फलंदाजातील तांत्रिक क्षमता उत्तम असली तरी टी-२० क्रिकेटमध्ये प्रभाव पाडू न शकल्यामुळेच त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळवता आले नाही. निवड समितीने गिलच्या जागी संजू सॅमसनची निवड केली असली तरी त्यालाही अद्याप निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवता आलेला नाही.

टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, सॅमसनला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. पुढील तीन टी-२० सामन्यांत चांगली कामगिरी केली नाही तर त्याची सलामीची जागा इशान किशन घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच त्याच्यावर सध्या प्रचंड दबाव आहे. यावर्षी सुरुवातीला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सॅमसनला पाच सामन्यांत चांगली कामगिरी करता आली नाही. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर तो तीन वेळा बाद झाला. आता न्यूझीलंडविरुद्धही तो १० आणि ६ धावा करू शकला. कायले जेमिसन आणि मॅट हेन्री यांनी त्याला बाद केले. त्यामुळे वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळण्याच्या त्याच्या कौशल्याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याचबरोबर त्याच्या यष्टीरक्षणाच्या कामगिरीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अर्शदीप सिंगचा वाइड यॉर्कर अडवता न आल्यामुळे न्यूझीलंडला गेल्या सामन्यात २०० धावांचा पल्ला ओलांडता आला होता.

कर्णधार सूर्यकुमारचा खराब याची चिंता फॉर्म संघव्यवस्थापनाला सतावत होती. मात्र ३७ चेंडूंत ८२ धावांची दमदार खेळी करत त्याने आपल्या टीकाकारांना सणसणीत चपराक लगावली आहे. त्याचबरोबर २३ सामन्यांत अर्धशतक न झळकावलेल्या सूर्यकुमारला आता सूर गवसला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात सात विकेट्स राखून विजय मिळवल्यामुळे भारत या मालिकेत २-० अशा आघाडीवर आहे. जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज अभिषेक शर्माने या सामन्यात उपयुक्त योगदान दिले असते तर भारताला यापेक्षा जास्त चांगला विजय मिळवता आला असता. सूर्यकुमारने पहिल्या १० चेंडूंत १० धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने थेट चौथा गिअर टाकत पुढील २७ चेंडूंत ७२ धावांची बरसात केली. त्याच्या या झंझावातामुळे भारताने २०९ धावांचे आव्हान १५.२ षटकांत सहजपणे पार केले. भारतीय संघ १.१ षटकांत २ बाद ६ अशा

संकटात सापडला होता. मात्र किशानने आक्रमक खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीतील हवाच काढून घेतली. किशन आणि सूर्यकुमार बहरत असताना त्यांनी प्रतिषटकामागे १४.५०च्या सरासरीने धावा कुटत भारताला विजय मिळवून दिला.

गोलंदाजीत, डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आणि मध्यमगती गोलंदाज हर्षित राणा यांनी मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखून धरले. अर्शदीपने पहिल्या दोन षटकांत ३६ धावा बहाल केल्या होत्या. अक्षर पटेलच्या बोटाला झालेली दुखापत काहीशी चिंताजनक असली तरी टी-२० वर्ल्डकपआधी तो पूर्ण बरा होणार, ही टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे.

वनडे मालिका जिंकणारा न्यूझीलंडचा संघ टी-२० मालिकेत मात्र पुरता ढेपाळला. आता ते कशी जोमाने मुसंडी मारतात, यावरून या मालिकेचा निकाल लागणार आहे.

सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४० टी-२०पैकी ३० सामने जिंकले आहेत. विराट कोहलीनेही कर्णधार म्हणून तेवढेच सामने जिंकले होते. आता भारताचा टी-२०मधील तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार होण्यासाठी सूर्यकुमारला कर्णधार म्हणून एका विजयाची आवश्यकता आहे.

ग्लेन फिलिप्स याने ८५ सामन्यांत ९८ षटकार ठोकले आहेत. आता टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा विक्रम पार करून न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज बनण्यासाठी फिलिप्सला दोन षटकारांची गरज आहे.

दुसऱ्या टी-२० सामन्यांत ३७ चेंडूंत ८२ धावांची खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला टी-२० क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी ९८ धावांची आवश्यकता आहे. असे करणारा तो भारताचा तिसरा खेळाडू ठरणार आहे.

बर्सपराची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक

बर्सपरा क्रिकेट स्टेडियमची टणक आणि काळ्या मातीची पाटा खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जात आहे. संध्याकाळच्या सुमारास दव पडणार असल्यामुळे मैदानावरील गवताचा तसेच ओलसरपणाचा फायदा स्विंग करणाऱ्या वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या काही षटकांमध्ये होण्याची शक्यता आहे. सीमारेषेमधील अंतर छोटे असल्यामुळे तसेच वेगवान आऊटफिल्डमुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्णोई, हर्षित राणा

न्यूझीलंड : मिचेल सान्तनेकर (कर्णधार), डेवॉन कॉनवे, वेबॉन जेकब्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम रॉबिन्सन, जिमी नीशाम, ईश सोधी, सॅक फोल्क्स, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, रचिन रवींद्र, कायले जेमिसन, मॅट हेन्री, जेकब डफी.

इंधन दरवाढीचा फटका! इंडिगोकडून आजपासून तिकिटांवर अधिभार; विमानप्रवास महागणार

Mumbai : पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री दोन ब्लॉक; प्रभादेवी पूल पाडण्यासाठी बोरिवली ते भाईंदर दरम्यानही ब्लॉक

Maharashtra Weather Update : राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान वादळी पावसाचा इशारा

सिलिंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणे होणार मुश्किल; भारतासमोर नवे संकट

देशात एलपीजी, पेट्रोल, डिझेलची कमतरता नाही; केंद्राची पत्रकार परिषदेत माहिती