वेलिंग्टन : नवीन वर्षात भारत दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंडने आगामी एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी बुधवारी संघ जाहीर केले. अनुभवी फलंदाज केन विल्यम्सनने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली असून मिचेल सँटनर फक्त टी-२० मालिकेसाठीच संघाचा भाग आहे. त्यामुळे मिचेल ब्रेसवेलकडे न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यानंतर २१ जानेवारीपासून उभय संघांत पाच टी-२० सामनेदेखील खेळवण्यात येतील. ७ फेब्रुवारीपासून भारतात पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टीने टी-२० मालिका निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, विल्यम्सन दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये करारानुसार खेळणार आहे. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अनुपलब्ध असेल. विल्यम्सन आंतरराष्ट्रीय टी-२०तून आधीच निवृत्त झाला आहे. तसेच सँटनर दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्याने त्याचा फक्त टी-२० मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे. तसेच टॉम लॅथम, मॅट हेन्री हेदेखील विविध कारणास्तव एकदिवसीय मालिकेचा भाग नसतील.
डावखुरा फिरकीपटू जेडन लीनॉक्स, मध्यमगती गोलंदाज क्रिस्टन क्लार्क यांचा प्रथमच न्यूझीलंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच भारतीय वंशाचा आदित्य अशोकही या संघाचा भाग आहे. टी-२० मालिकेसाठी जेकब डफी, हेन्री, रचिन रवींद्र, जेम्स नीशाम हे अनुभवी खेळाडू किवी संघात परततील.
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचे संघ
एकदिवसीय मालिका : मिचेल ब्रेसवेल (कर्णधार), आदित्य अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेवॉन कॉन्वे, झॅक फोल्क्स, मिच हे, कायले जेमिसन, निक केली, जेडन लीनॉक्स, डॅरेल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल रे, विल यंग.
टी-२० मालिका : मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, झॅक फोल्क्स, मॅट हेन्री, कायले जेमिसन, बेवॉन जेकब्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, इश सोधी.