PTI
क्रीडा

IND vs NZ : विश्वचषकाची पूर्वपरीक्षा आजपासून! नागपूर येथे भारताची न्यूझीलंडशी पहिली टी-२० लढत; सूर्यकुमारच्या कामगिरीकडे लक्ष

मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता ‌अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणारी टी-२० मालिका ही भारतासाठी एकप्रकारे विश्वचषकाची पूर्वपरीक्षा असणार आहे.

Swapnil S

नागपूर : मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता ‌अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणारी टी-२० मालिका ही भारतासाठी एकप्रकारे विश्वचषकाची पूर्वपरीक्षा असणार आहे. नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० सामना खेळवण्यात येणार असून भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे या मालिकेत विशेष लक्ष असेल.

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत नुकताच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली. मात्र आता लक्ष पूर्णपणे टी-२० सामन्यांकडे वळले आहे. भारतीय संघ अनुक्रमे २१, २३, २५, २८ व ३१ जानेवारी या दिवशी न्यूझीलंडशी अनुक्रमे पाच सामने खेळणार आहे. मग ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

मुख्य म्हणजे गेल्याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेपूर्वी शुभमन गिल भारताचा उपकर्णधार होता. त्या मालिकेत भारताने ३-१ असे यश संपादन केले. मात्र आता गिल भारतीय संघाचा भाग नाही. तसेच विश्वचषकासाठी भारताने १५ खेळाडूंची निवड केलेली असून तिलक वर्मा या मालिकेतील किमान तीन सामन्यांना मुकणार आहे, तर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी रवी बिश्नोई व श्रेयस अय्यर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. अशा स्थितीत दोघांनाही निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी आहे.

दरम्यान, सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने गतवर्षी आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग भारताने ऑस्ट्रेलियालाही त्यांच्याच देशात धूळ चारली. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकून भारताने विश्वचषकाच्या तयारीच्या दिशेने योग्य वाटचाल केली. भारताने २०२४च्या टी-२० विश्वचषकापासून एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. म्हणजेच गेल्या ३४ सामन्यांत भारताने २९ टी-२० लढती जिंकलेल्या आहेत. मात्र सूर्यकुमारच्या कामगिरीची भारताचा नक्कीच चिंता सतावत आहे.

३५ वर्षीय सूर्यकुमारला गेल्या वर्षभरात एकही टी-२० अर्धशतक झळकावता आलेले नाही. तसेच १५हून अधिक डावांत तो एकेरी धावसंख्येत बाद झाला आहे. अनुभवी खेळाडू म्हणून सूर्यकुमारने चौथ्या स्थानी खेळताना आता लय मिळवणे गरजेचे आहे. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. ते आता टी-२० मालिकेत परतल्याने भारतीय संघ बळकट होईल.

न्यूझीलंडच्या संघातही अनुभवी खेळाडू परतले असून डावखुरा मिचेल सँटनर त्यांचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. मिचेल ब्रेसवेलच्या तंदुरुस्तीविषयी संभ्रम असला तरी डेवॉन कॉन्वे, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स असे प्रतिभावान खेळाडू किवी संघाच्या ताफ्यात आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ भारताला कडवी झुंज देईल, यात शंका नाही.

किशन तिसऱ्या क्रमांकावर

भारतीय संघात फक्त अभिषेक शर्मा व संजू सॅमसन यांचे स्थान सलामीला पक्के मानले जात आहे. तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकापर्यंत कोणता फलंदाज कोणत्या स्थानी येईल, हे सांगणे कठीण आहे. मात्र तूर्तास तिलक संघात नसल्याने इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे सूर्यकुमारने पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे मुंबईकर श्रेयसला प्रतीक्षा करावी लागू शकते. सॅमसन व अभिषेक पॉवरप्लेमध्ये शानदार फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. तसेच पाचव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक या मालिकेत भारतासाठी निर्णायक ठरेल. हार्दिक व अक्षर पटेल अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी फलंदाजी करतील. सातव्या क्रमांकासाठी शिवम दुबे व रिंकू सिंग यांच्यात चुरस आहे. मात्र गेल्या काही लढतींचा आढावा घेतल्यास दुबेला प्राधान्य दिले जाऊ शकते.

बुमराच्या पुनरागमनाने गोलंदाजी बळकट

तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा या मालिकेसाठी संघाचा भाग असल्याने गोलंदाजी विभाग आपोआप बळकट होईल. हर्षित राणाने न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीत छाप पाडतानाच आठव्या क्रमांकावर फलंदाजीतही योगदान दिले. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला अर्शदीप सिंगच्या आधी संधी देऊ शकते. वरुण चक्रवर्ती भारताचा प्रमुख फिरकीपटू असेल. मात्र कुलदीप यादवलाही संधी दिली जाणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच रवी बिश्नोईचा पर्यायही भारताकडे उपलब्ध आहे. तूर्तास तरी आठव्या क्रमांकावर हर्षित, नवव्या स्थानी बुमरा, १०व्या स्थानी अर्शदीप व ११व्या स्थानी वरुण अशी भारताची संघरचना असेल, असे समजते. घरच्या मैदानात भारतीय गोलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

मिचेल, फिलिप्स यांना रोखण्याचे आव्हान

भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत २ शतके साकारणारा डॅरेल मिचेल व धोकादायक ग्लेन फिलिप्स यांना रोखण्याचे आव्हान भारताच्या गोलंदाजांपुढे असेल. तसेच डेवॉन कॉन्वे व रचिन रवींद्र यांची जोडीही भारताला सतावू शकते. गोलंदाजीत जेकब डफी हा क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असल्याने भारतीय खेळपट्ट्यांवर त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. कायले जेमिसन त्यांचा प्रमुख गोलंदाज असेल. फिरकी विभागात सँटनर व इश सोधी ही जोडी घातक ठरू शकते. एकंदर किवी संघदेखील समतोल आहे.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

  • नागपूर येथील जामठाच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना नेहमीच सहाय्य लाभले आहे. त्यामुळे दोन्ही संघांतील फिरकीपटूंची कामगिरी निर्णायक ठरेल.

  • २०१६च्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने नागपूरलाच भारताविरुद्ध १२६ धावांचा यशस्वी बचाव केला होता. बुधवारी पावसाची मूळीच शक्यता नसून रात्रीच्या वेळेस दव मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.

उभय संघांत आतापर्यंत २५ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी १४, तर न्यूझीलंडने १० लढती जिंकल्या आहेत. त्यांच्यातील एक लढत टाय झाली होती.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमरा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, झॅक फोल्क्स, मॅट हेन्री, कायले जेमिसन, बेवॉन जेकब्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, इश सोधी, क्रिस्टन क्लार्क.

अश्लील व्हिडिओ प्रकरणी कर्नाटकच्या डीजीपींचे निलंबन; "कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही" - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Thane : जेवणाच्या जास्त दराबाबत विचारणा महागात; भिवंडीच्या ढाब्यावर तरुणाला मारहाण, Video व्हायरल, पोलिसांनी घेतली दखल

'स्वत:चं मत कुठे गेलं?' ची पोस्ट व्हायरल; जळगावातील महिला उमेदवाराला खरंच शून्य मतं? जाणून घ्या सत्य

Mumbai : मुदतीआधीच बेलासिस उड्डाणपुलाचे काम फत्ते! मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेवमधील वाहतूककोंडी फुटणार

महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ; MMRDA कडून ९६ अब्ज डॉलरचे गुंतवणूक करार; ९.६ लाख रोजगारांची निर्मिती होणार