दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये सामना सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील हा पाचवा सामना असून टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानची सुरुवात आशादायक झाली मात्र नंतर पाकिस्तानने पहिल्या १० षटकात २ विकेट्स गमावल्या. नवव्या षटकापर्यंत बाबर आझम आणि इमाम-उल-हक टिकून क्रिझवर टिकून होते.
डावाच्या नवव्या षटकात ४१ धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. हार्दिक पंड्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबरने चौकार मारला. यानंतर हार्दिक स्वतःवर रागावलेला दिसला. पुढच्याच चेंडूवर हार्दिकने बाबरला यष्टीरक्षकक के एल राहुलकरवी झेलबाद केले आणि पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजीसाठी प्रामुख्याने अनुभवी बाबर आझम आणि कर्णधार रिझवान यांच्यावर भिस्त आहे, असे मानले जात असताना हार्दिकने बाबरला गप्प केले. बाबरने २६ चेंडूत पाच चौकारांसह २३ धावा केल्या आणि माघारी परतला.
पाकिस्तानला दुसरा धक्का
पहिल्या धक्क्यातून सावरत असतानाच पाकिस्तानला डावाच्या १० व्या षटकात दुसरा धक्का बसला. कुलदीप यादवने टाकलेल्या चेंडूवर इमाम-उल-हक पटकन धाव काढण्यासाठी गेला. नॉन स्ट्राईकर एंडला असलेल्या अक्षर पटेलने लगेच धावत येऊन चेंडू टिपला आणि विकेटच्या दिशेने मारला. अक्षर पटेलच्या थेट हिटवर इमाम उल हक धावचीत झाला. इमाम २६ चेंडूत फक्त १० धावा करू शकला. अक्षर पटेलच्या या अप्रतिम थ्रोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारतासाठी दोन्ही विकेट्स चांगल्या वेळी आल्या आहेत, विशेषतः मोहम्मद शमीने फक्त २ षटके टाकल्यानंतर भारताच्या या वेगवान गोलंदाजाला पाय दुखण्याचा त्रास झाला. फिजिओने त्याच्यावर बारकाईने नजर टाकल्यानंतर, शमीने षटक पूर्ण केले पण काही उपचारांसाठी तो मैदानाबाहेर गेला. त्याने भारताकडून सुरुवातीचा डाव ११ चेंडूंच्या षटकात ५ वाईड देऊन केला.
भारताचा अंतिम संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
पाकिस्तानचा अंतिम संघ: इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.