गुवाहाटी : पहिल्या डावात भारतीय संघाला अवघ्या २०१ धावांवर गुंडाळल्यानंतर त्यांच्यासमोर विजयासाठी ४०० धावांचे आव्हान ठेवले असते तरी पुष्कळ झाले असते. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना हैराण करण्याची एकही संधी गमावली नाही. तब्बल ५४९ धावांची आघाडी घेतल्यानंतरच पाहुण्यांनी दुसरा डाव ५ बाद २६० धावांवर घोषित केला. आता दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले ५४९ धावांचे अशक्यप्राय उद्दिष्ट गाठताना भारताची चौथ्या दिवसअखेर २ बाद २७ अशी अवस्था झाली असताना, दक्षिण आफ्रिकेला २-० असा व्हाइटवॉश देण्याची नामी संधी चालून आली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना झुंजवत ठेवून आफ्रिकेने मास्टरस्ट्रोकच जणू लगावला, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात आहे.
विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी दोन लक्ष्य ठेवली होती. त्यातील पहिले म्हणजे यजमान भारतासमोर भलेमोठे उद्दिष्ट ठेवणे आणि दुसरे म्हणजे जास्तीत जास्त वेळ फलंदाजीचा सराव करणे. त्या दोन्ही गोष्टीत दक्षिण आफ्रिका संघ यशस्वी ठरला असेच म्हणावे लागेल. त्रिस्तान स्टब्सच्या ९४ धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ५ बाद २६० धावा करत डाव घोषित केला. पहिल्या डावात अर्धशतक एका धावेने हुकल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. मात्र त्याला शतकाने हुलकावणी दिली. ९ चौकार आणि १ षटकारासह ९४ धावांवर त्याला रवींद्र जडेजाने त्रिफळाचीत केले. आफ्रिकेचे अशक्यप्राय ध्येय गाठताना भारताने दुसऱ्या डावातही नांगी टाकली. यशवस्वी जैस्वाल (१३) आणि लोकेश राहुल (६) झटपट माघारी परतल्यानंतर आता गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखालील टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार आहे. चौथ्या दिवसअखेर साई सुदर्शन (खेळत आहे २) आणि नाइट-वॉचमन कुलदीप यादव (खेळत आहे ४) यांनी भारताची खिंड लढवली.
गुवाहाटी कसोटीच्या चारही दिवसांत पूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकलेला नाही. अंधुक प्रकाशामुळे वारंवार खेळ थांबवावा लागला आहे. भारतीय फलंदाजांनी पाचव्या दिवशी कडवा प्रतिकार केल्यास, यजमानांसाठी ही जमेची बाजू ठरू शकते. मात्र चौथ्या दिवशी तिसऱ्या सत्रापर्यंत फलंदाजी करण्याचा निर्णय आफ्रिकेसाठी कितपत फायदेशीर ठरणार, याचा निकाल पाचव्या दिवशीच लागू शकतो. भारतीय फलंदाजांनी मैदानावर ठाण मांडून कसोटी अनिर्णीत राखल्यास, दक्षिण आफ्रिकेला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीत ८ गुण गमवावे लागतील, त्यांना फक्त चार गुण मिळतील. मात्र आफ्रिकेने ही कसोटी जिंकल्यास, त्यांच्या खात्यात १२ गुणांची भर पडेल.
चौथ्या दिवसाचा संपूर्ण खेळ गाजवला तो त्रिस्तान स्टब्स याने. त्याने चौथ्या विकेटसाठी टोनी डे झोर्झी (४९) याच्यासोबत १०१ धावांची भागीजारी रचली. तसेच पाचव्या विकेटसाठी विआन मडलरसह (नाबाद ३५) ८२ धावा जोडल्या. त्याआधी रायन रिकेलटन (२८) आणि आयडेन मार्करम (३५) यांनी पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागी केली होती. कर्णधार टेम्बा बावुमा मात्र दुसऱ्या डावात अपयशी ठरला. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर नितीशकुमारकडे झेल देत तो ३ धावांवर माघारी परतला.
चौथा दिवस संपला तरी खेळपट्टी हवी तशी बिघडलेली नाही. पहिले तीन दिवस फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून चांगली साथ मिळत होती. पण चौथ्या दिवशी खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरलेली पाहायला मिळाली. त्यामुळेच रवींद्र जडेजाला विकेटसाठी झगडावे लागले. तरीही जडेजाने चार विकेट्स मिळवत आपली छाप पाडली.
भारतीय संघ फलंदाजीला उतरला तेव्हा सलामीवीरांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल अवघ्या १३ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर राहुलनेही लगेचच पॅव्हेलियनची वाट धरली. साई सुदर्शन आणि कुलदीप यादव यांनी आणखीन पडझड होऊ दिली नाही. आता भारताला शेवटच्या दिवशी कसोटी वाचवण्यासाठी झुंज द्यावी लागणार आहे.
गंभीरने कामगिरी करूनही दाखवावी -कुंबळे
भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर जशी वक्तव्ये करतो, त्या पद्धतीने त्याने आता कामगिरी करून दाखवावी, असा टोला भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने हाणला. “तुम्हाला आता तुमचे ते शब्द सिद्ध करावे लागतील. तुम्हाला आज जगातील सर्वोत्तम संघाविरूद्ध ते शब्द खरे करण्याची संधी आहे. त्यांनी कसोटीची वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. आजच्या सामन्यात तुम्हाला तुमचे चरित्र कसे आहे, हे सिद्ध करण्याची संधी आहे. आपण जिंकलो नाही तरी लढाऊ वृत्तीने खेळून पराभव टाळण्यासाठी झुंज देऊ शकतो, हे दाखवून देण्याची संधी आहे. तुम्ही जे काही बोलला ते ठीक आहे. मात्र आज तुम्हाला मैदानावर तुमचे शब्द प्रत्यक्षात साकार करता आले पाहिजेत.
यशस्वीच्या २५०० धावा पूर्ण
दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना, यशस्वी जैस्वालने कसोटीत अडीच हजार धावांचा टप्पा गाठला. दुसऱ्या डावात त्याला १३ धावा करता आल्या असल्या तरी त्याने ही किमया साधली. यशस्वी सर्वात जलद २,५०० कसोटी धावा करणारा चौथा भारतीय ठरला आहे. त्याने ५३ डावांत हे ध्येय गाठले. वीरेंद्र सेहवागने ४७ धावांत ही किमया करत अग्रस्थान पटकावले.
जडेजाचे आफ्रिकेविरुद्ध ५० बळी
रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५० पेक्षा जास्त विकेट्स टिपण्याची करामत केली. तो आफ्रिकेविरुद्ध ५० कसोटी बळी घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्यापूर्वी अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग आणि रविचंद्रन अश्विन यांनी ही कामगिरी केली आहे. कुंबळेने आफ्रिकेविरुद्ध ८४ विकेट्स मिळवले असून श्रीनाथ (६४ बळी), हरभजन (६०) आणि अश्विन (५७) यांनीही छाप पाडली आहे.