क्रीडा

IND vs SA: दुहेरी शतकांनंतरही निराशा! दक्षिण आफ्रिकेकडून ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग; भारताचा पराभव

तारांकित विराट कोहली (९३ चेंडूंत १०२ धावा) आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड (८३ चेंडूंत १०५ धावा) यांनी साकारलेल्या धडाकेबाज शतकांनंतरही भारताच्या पदरी निराशा पडली. एडीन मार्करमने (९८ चेंडूंत ११० धावा) झळकावलेल्या जिगरबाज शतकाला अन्य फलंदाजांची सुरेख साथ लाभल्याने दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ४ गडी व ४ चेंडू राखून पराभव केला.

Swapnil S

रायपूर : तारांकित विराट कोहली (९३ चेंडूंत १०२ धावा) आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड (८३ चेंडूंत १०५ धावा) यांनी साकारलेल्या धडाकेबाज शतकांनंतरही भारताच्या पदरी निराशा पडली. एडीन मार्करमने (९८ चेंडूंत ११० धावा) झळकावलेल्या जिगरबाज शतकाला अन्य फलंदाजांची सुरेख साथ लाभल्याने दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ४ गडी व ४ चेंडू राखून पराभव केला.

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने भारताने दिलेलेल ३५९ धावांचे मोठे लक्ष्य ४९.२ षटकांत सहज गाठले. मार्करमच्या शतकासह डेवाल्ड ब्रेविस (३४ चेंडूंत ५४) व मॅथ्यू ब्रीट्झके (६४ चेंडूंत ६८) यांनीही तुफानी अर्धशतके झळकावली. भारताची खराब गोलंदाजी, ढिसाळ क्षेत्ररक्षण व दवामुळे ओलसर झालेली खेळपट्टी या घटकांनीही आफ्रिकेच्या विजयात हातभार लावला. त्यामुळे आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून आता शनिवारी विशाखापट्टणम येथे निर्णायक तिसरा सामना खेळवण्यात येईल.

विराटचे शानदार ५२वे शतक आणि रोहितच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. रांची येथे झालेल्या लढतीत भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने अखेरच्या षटकापर्यंत कडवी झुंज दिली. मात्र ४९.२ षटकांत त्यांचा संघ ३३२ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. रायपूरमध्ये भारताला विजयी आघाडीची संधी होती. मात्र आता शनिवारी तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताला पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

दरम्यान, सध्या आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली. आता ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघांत पाच टी-२० सामनेही होणार आहेत. एकदिवसीय मालिकेसाठी अनुभवी फलंदाज राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. शुभमन गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याने राहुलवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा ३८ वर्षीय रोहित व ३७ वर्षीय विराट यांना खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे.

रोहितने सलग ३ सामन्यांत ५०हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या लढतीत अर्धशतक, तर तिसऱ्या सामन्यात शतक साकारले होते. दुसरीकडे विराटनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या लढतीत अर्धशतक झळकावल्यावर आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेची सुरुवात शतकाद्वारे केली. त्यामुळे या दोघांना एकत्रित खेळताना पाहून चाहतेही आनंदी आहेत. तसेच उर्वरित दोन सामन्यांतही रोहित-विराट टीकाकारांची तोंडे बंद करून एकदिवसीय संघातील स्थान असेच टिकवून ठेवतील, अशी अपेक्षा आहे.

२०२७च्या विश्वचषकापर्यंत दोघांचे संघातील स्थान टिकून राहणार की नाही, याविषयी आतापासूनच चर्चा सुरू आहे. तसेच काही संकेतस्थळ व वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर व बीसीसीआयचे पदाधिकारी एकदिवसीय मालिकेनंतर रोहित-विराटविषयी बैठक करणार असल्याचे समजते. मात्र रोहित व विराट या दोघांनीही गेल्या दोन मालिकांमध्ये आपल्या बॅटद्वारे सर्वांना प्रत्युत्तर देतानाच निवृत्तीच्या अफवांना धुडकावून लावले आहे. रोहित-विराट आता टी-२० व कसोटीतून निवृत्त झाले असून फक्त एकदिवसीय प्रकारातच भारताचे प्रतिनिधित्व करतात.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ५ बाद ३५८ (ऋतुराज गायकवाड १०५, विराट कोहली १०२) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : ४९.२ षटकांत ६ बाद ३६२ (एडीन मार्करम ११०, मॅथ्यू ब्रीट्झके ६८, डेवाल्ड ब्रेविस ५४)

सामनावीर : एडीन मार्करम

Putin India Visit : पुतिन मॉस्कोहून रवाना; संध्याकाळी ६.३५ ला पोहोचणार दिल्लीत, मोदींसोबत खास डिनर; बघा संपूर्ण वेळापत्रक

भारत-रशिया करार : रशियन लष्करी तळ भारताला वापरता येणार

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

'बोलो जुबां केसरी'...नववधूची स्टेजवरून शाहरूख खानकडे अनोखी डिमांड; नेटकरी घेतायेत मजा - बघा Video

मरीन ड्राइव्ह ते ऑरेंज गेट भुयारी मार्ग: प्रकल्पाचा शानदार शुभारंभ; मेट्रो-३ मार्ग, पश्चिम-मध्य रेल्वे आणि ७०० हेरिटेज इमारतींखालून जाणार रस्ता