नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे उभय संघांतील ही कसोटी पाचव्या दिवसापर्यंत लांबली असून भारताला अखेरच्या दिवशी विजयासाठी आणखी ५८ धावांची, तर विंडीजला तब्बल ९ विकेट्स मिळवण्याची आवश्यकता आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) सुरू असलेल्या या कसोटीत सोमवारच्या चौथ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात १८ षटकांत १ बाद ६३ धावा केल्या आहेत. विंडीजने भारतापुढे १२१ धावांचे लक्ष्य ठेवले असून यशस्वी जैस्वालच्या (७ चेंडूंत ८ धावा) भारताने एक फलंदाज गमावला आहे. दिवसअखेर के. एल. राहुल ५४ चेंडूंत २५, तर साई सुदर्शन ४७ चेंडूंत ३० धावांवर नाबाद आहे.
जॉन कॅम्पबेल (१९९ चेंडूंत ११५ धावा) आणि शाय होप (२१४ चेंडूंत १०३ धावा) यांनी झळकावलेल्या शतकांमुळे विंडीजने भारताला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास भाग पाडले. मात्र आता पाचव्या दिवशी पहिल्या तासाभरात उरलेल्या ५८ धावा करून भारतीय संघ मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन करेल, अशी आशा आहे.
भारतीय संघाने सप्टेंबरमध्ये दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आता २५ वर्षीय शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मायदेशात प्रथमच कसोटी मालिका खेळत आहे. भारताने विंडीजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने धूळ चारून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ही लढत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातच संपुष्टात आली. त्यामुळे विंडीजच्या फलंदाजांवरही टीका झाली, तर खेळपट्टीही गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे समोर आले. दुसरी कसोटी मात्र पाचव्या दिवसापर्यंत लांबली असून विंडीज भारताला चोख प्रत्युत्तर देत आहे.
तत्पूर्वी, दुसऱ्या कसोटीत भारताने पहिला डाव ५१८ धावांवर घोषित केला. मग विंडीजचा पहिला डाव भारताने २४८ धावांत गुंडाळून त्यांच्यावर फॉलोऑन लादला. २७० धावांनी पिछाडीवर असूनही दुसऱ्या डावात मात्र विंडीजने कडवा प्रतिकार केला. तिसऱ्या दिवसअखेर विंडीजने २ बाद १७३ धावा केल्या होत्या. तेथून पुढे सोमवारी चौथ्या दिवसाला प्रारंभ करताना ३२ वर्षीय कॅम्पबेल व ३१ वर्षीय होप यांनी पुन्हा भारतीय गोलंदाजांना हैराण केले.
कॅम्पबेलने १२ चौकार व ३ षटकारांसह पहिलेच शतक साकारले. तो कारकीर्दीतील २५वी कसोटी खेळत आहे. अखेरीस रवींद्र जडेजाने कॅम्पबेलला ११५ धावांवर पायचीत पकडून ही जोडी फोडली. कॅम्पबेल व होप यांनी तिसऱ्या विकेटसाठी १७७ धावांची भागीदारी रचली. पहिल्या सत्रात भारताला एकच बळी मिळवता आल्याने विंडीजने उपहाराला ३ बाद २५२ धावांपर्यंत मजल मारली.
दुसऱ्या सत्रात मग होप आणि कर्णधार रॉस्टन चेस यांनी विंडीजची पिछाडी भरून काढली. होपने १२ चौकार व २ षटकारांसह कारकीर्दीतील तिसरे कसोटी शतक साकारले. यापूर्वी २०१७मध्ये त्याने अखेरचे शतक झळकावलो होते. होप व चेस यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भर घातली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर १०३ धावांवर होपचा त्रिफळा उडाला. तेथून मग जसप्रीत बुमराने पुढाकार घेत विंडीजचे झटपट दोन बळी मिळवले. फिरकीपटू कुलदीप यादवने चेस (४०) व टेव्हिन इमलाच (१२) यांना माघारी पाठवले, तर बुमराने वॉरिकन (३), अँडरसन फिलिप (२) यांना बाद केले.
चहापानाला अर्धा तास शिल्लक असताना विंडीजचा नववा फलंदाज बाद झाला. त्यांची ९ बाद ३११ अशी स्थिती असताना भारत लवकरच विंडीजचा अखेरचा बळी मिळवून ५० धावांच्या आसपासचे लक्ष्य गाठणार, असे वाटले. मात्र सातव्या क्रमांकावरील जस्टिन ग्रीव्ह्सने ११व्या क्रमांकावरील जेडन सील्सच्या साथीने भारताला चांगलेच सतावले. या दोघांनी तिसऱ्या सत्रापर्यंत खेळ लांबवला. ग्रीव्ह्सने कारकीर्दीतील पहिलेच अर्धशतक साकारले, तर सील्सने १ चौकार-षटकारासह ३२ धावांचे योगदान दिले. या दोघांनी अखेरच्या विकेटसाठी दीड तास फलंदाजी करताना ७९ धावांची भर घातली.
अखेरीस तिसऱ्या सत्रात बुमरानेच सील्सला बाद केले व विंडीजचा दुसरा डाव ११८.५ षटकांत ३९० धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे विंडीजने भारतापुढे १२१ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून दुसऱ्या डावात बुमरा व कुलदीप यांनी प्रत्येकी ३, तर सिराजने २ बळी मिळवले. आता पाचव्या दिवशी भारतीय संघ विजय मिळून दिवाळीपूर्वी चाहत्यांना मालिका विजयाची भेट देईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, गिलच्या नेतृत्वात भारताने जून ते ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. २०२४मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारली होती. यावेळी मात्र चित्र बदलले असून गिलच्या नेतृत्वात भारत मायदेशात पहिली मालिका जिंकण्याच्या दिशेने कूच करत आहे.
२०२५ या वर्षात भारताचा वेगवान गोलंदाजाने मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३७ कसोटी बळी घेतले आहेत. सिराजने ८ सामन्यांतील १५ डावांत इतके गडी बाद केले आहेत. झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझरबानी ९ सामन्यांतील ३६ बळींसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ५ बाद ५१८ (डाव घोषित)
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ८१.५ षटकांत सर्व बाद २४८
वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ११८.५ षटकांत सर्व बाद ३९० (जॉन कॅम्पबेल ११५, शाय होप १०३; जसप्रीत बुमरा ३/४४, कुलदीप यादव ३/१०४)
भारत (दुसरा डाव) : १८ षटकांत १ बाद ६३ (साई सुदर्शन नाबाद ३०, के. एल. राहुल नाबाद २५)